जामनेर येथील खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 08:51 PM2019-04-25T20:51:17+5:302019-04-25T20:51:54+5:30
बालिकेची छेड काढल्याच्या आरोपावरुन पळासखेडा (गुजराचे), ता.जामनेर येथील अनिल कडू खंडारे या तरुणाचा खून करण्यात आला होता.
जळगाव - बालिकेची छेड काढल्याच्या आरोपावरुन पळासखेडा (गुजराचे), ता.जामनेर येथील अनिल कडू खंडारे या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे (सर्व रा.पळासखेडा गुजराचे ता.जामनेर) अशी या शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
६ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी सात वाजता वरील पाचही जणांनी अनिल याला बेदम मारहाण केली होती. यावेळी पत्नी सुनीता तसेच भाऊ व वहिनीने धाव घेऊन अनिलची त्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. हल्लेखोरांनी अनिल याला जखमी अवस्थेत जामनेर रस्त्यावरील एका विहिरीत फेकून दिले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पत्नी सुनीता खंडारे यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलीस स्टेशनला पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.