विषबाधेने आणखी पाच मेढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 09:31 PM2019-06-22T21:31:21+5:302019-06-22T21:31:28+5:30
भोरटेक : मृतांचा आकडा गेला शंभरावर
कजगाव , ता.पारोळा : मेंढपाळ कुटूंबाच्या मेंढ्या व शेळ्यांचे मृत्यू सत्र थांबता थांबत नसल्याने मेंढपाळ कुटूंब हताश झाला आहे. तीन दिवसातच शेळ्या व मेंढ्यांच्या मृत्यूने शंभरी ओलांडली आहे. यामुळे भयभीत झालेल्या या कुटुंंबाने आपला मुक्काम भोरटेक येथून दुसरीकडे हलविला आहे. शुक्रवारी सकाळी चार मेंढ्या व एक शेळी मृत झाल्या.
पिपराळा, ता.नांदगाव येथील भीमा सोमा शिंदे हे मेंढपाळ कुटूंब आपल्या सह इतर नातेवाईकांच्या मेंढ्या व शेळ्या घेऊन जळगाव जिल्ह्यात आलेले होते. १८ रोजी होळ शिवारात मेंढ्या व शेळ्यांनी नीलकंद किंवा गवत खाल्ल्याने त्यांना यातून विषबाधा झाली. यात १९ रोजी दिवसभरात एका मागे एक करत ८५ शेळ्या व मेंढ्या दगावल्या. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उर्वरीत शेळ्या व मेंढ्यांवर प्रथमोपचार केले मात्र याचा काही प्रमाणातच फायदा झाला.
२० रोजी पुन्हा पंचवीस शेळ्या व मेढ्या दगावल्या. लागोपाठ दोन दिवसात हे मृत्यूसत्र सुरू असल्याने मेंढपाळ कुटुंब कमालीचे घाबरले. २० रोजी पशुवैद्यकीय अधिकारी चे पथक घटनास्थळी दाखल झाले. लागोपाठ दोन दिवस संपूर्ण तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले. मात्र पुन्हा २१ रोजी चार मेंढ्या व एक शेळी दगावल्याने हे कुटूंब हताश झाले.गेल्या तीन दिवसांत चक्क दोन दिवस त्याच्या वाड्यावर चुलीच पेटल्या नाहीत. झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीबरोबरच एकामागून एक मृत होत असलेल्या मुक्या प्राण्यांच्या वेदनांमुळे हा संपूर्ण कुटूंब निशब्द झाला आहे . शेळ्या व मढ्यांचे मृत्यू तांडव थांबत नसल्याने हादरलेल्या या कुटुंंबाने आपला मुक्काम भोरटेक येथून वडाळे ता.चाळीसगाव शिवारात हलविला आहे.