जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी

By विजय.सैतवाल | Published: March 6, 2024 11:53 PM2024-03-06T23:53:39+5:302024-03-06T23:54:00+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांना पदस्थापना व जिल्हाअंतर्गत बदल्या

Five police stations in Jalgaon district got officers in charge | जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी

जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मिळाले प्रभारी अधिकारी

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्यासह दोन पोलिस अधिकाऱ्यांची जिल्हाअंतर्गत बदली करण्यात आली आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवार, ६ मार्च रोजी काढले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या झाल्या. यामध्ये इतर जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात काही पोलिस अधिकारी आले. या बाहेरील जिल्ह्यातून आलेले पाच पोलिस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलिस निरीक्षक व सात पोलिस उपनिरीक्षकांना पदस्थापना देण्यात आली. यासोबतच दोन पोलिस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या.

या बदल्यांमध्ये जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विशाल जयस्वाल यांना रावेर पोलिस ठाणे, यावल पोलिस ठाण्याचे राकेश मानगावकर यांना जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यासोबतच अमरावती ग्रामीण येथून आलेले प्रदीप ठाकूर यांना यावल पोलिस ठाणे, नाशिक ग्रामीण येथून आलेले राजेंद्र कुटे यांना रामानंद नगर पोलिस ठाणे, अशोक पवार यांना पाचोरा पोलिस ठाणे, पांडुरंग पवार यांना भडगाव पोलिस ठाणे व मुंबई लोहमार्ग येथून आलेले दत्तात्रय निकम यांना सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. 

यासोबतच अहमदनगर येथून आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत खंडारे यांना चोपडा शहर पोलिस ठाणे, महेश येसेकर यांना पारोळा पोलिस ठाणे येथे पदस्थापना देण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण येथून आलेले पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना भुसावळ शहर पोलिस ठाणे, बबन पाटोळे यांना फैजपूर पोलिस ठाणे, चंद्रकांत दवंगे यांना जामनेर पोलिस ठाणे, संजय विधाते यांना पहूर पोलिस ठाणे, धुळे येथून आलेले कैलास दामोदर यांना रामानंद नगर पोलिस ठाणे, अहमदनगर येथून आलेले भरत दाते यांना पहूर पोलिस ठाणे, नंदुरबार येथून आलेल्या प्रिया वसावे यांना रावेर पोलिस ठाणे येथे पदस्थापना देण्यात आली आहे.

Web Title: Five police stations in Jalgaon district got officers in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.