पंतप्रधानांच्या सभास्थळी आढळले पाच सर्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:51 AM2019-10-14T11:51:51+5:302019-10-14T11:52:21+5:30
दक्षता म्हणून ४० सर्पमित्र
जळगाव : विमानतळासमोरील प्रांगणात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी दक्षता म्हणून वन्यजीव संरक्षण संस्थेचे ४० सर्पमित्र तैनात करण्यात आले होते. या वेळी तेथे विविध जातीचे पाच सर्प आढळून आले. ते संस्थेच्या सर्पमित्रांनी पकडून सुरक्षित स्थळी सोडले.
मोकळ््या मैदानात ही सभा ठेवण्यात आली होती. या परिसरात सर्प, वन्यजीवांचा वावर असल्याने सदर प्राणी आणि उपस्थित नागरिकांना हानी पोहचू नये म्हणून जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने वन्यजीव संरक्षण संस्थेला रेस्क्यू आणि जनजागृतीची जबाबदारी सोपवली होती.वन्यजीव संरक्षण संस्थेच्या ४० सर्पमित्रांनी सकाळी ८ वाजेपासून सभा संपेपर्यंत कर्तव्य बजावले. या दरम्यान २ तस्कर, २ धामण, १ डुरक्या घोणस असे वेगवेगळे ५ सर्प पार्किंग आणि मोकळ््या जागेतून पकडून त्याच परिसरात सुरक्षित ठिकाणी मुक्त केले. या विषयी उपस्थित पोलीस कर्मचारी, नागरिकांना सुरक्षितता कशी बाळगावी या बद्दल मार्गदर्शनही केले.
या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पमित्रांची भेट घेऊन करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले आणि सर्प किंवा कोणतेही सरीसृप प्राणी आढळून आल्यास गोंधळ न होऊ देता सुरक्षित रेस्क्यू करा असा सल्ला दिला.
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांना अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, बापूसाहेब रोहोम, पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, गोपनीय शाखेचे तुकाराम निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले. वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, योगेश गालफाडे, राहुल सोनवणे, जगदीश बैरागी, सतीश कांबळे, नीलेश ढाके, अमन गुजर, अमोल देशमुख, वासुदेव वाढे, सुरेंद्र नारखेडे, प्रसाद सोनवणे, भूषण चौधरी, बबलू शिंदे, राजेश सोनवणे, अभिषेक ठाकूर, स्कायलेब डिसुझा, ऋषी राजपूत, दिनेश सपकाळे, रितेश सपकाळे, लिनत जंगले, तेजस मोरे, शशिकांत सपकाळे, शुभम पवार, जयेश पाटील, रवी तायडे, पंकज अटकले, गणेश सपकाळे, पंकज बाविस्कर, योगेश सपकाळे यांच्यासह ४० सर्पमित्रांनी परिश्रम घेतले.