दहा वर्षात पाच वाघांचा तर तीन वर्षात १२ बिबट्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:24 AM2019-02-10T11:24:51+5:302019-02-10T11:25:03+5:30
वनविभागाच्या उपाययोजना तोकड्या, बहुंताश प्राण्यांनी केले स्थलांतर
सुशील देवकर
जळगाव : जैवविविधता संपन्न जंगलांची तोड होत असल्याने अन्नसाखळीला होत चाललेला धोका, जंगलांमध्ये वाढता मानवी वावर आदीमुळे वाघ, बिबट्या यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गेल्या १० वर्षात ५ वाघांचा तर ३ वर्षात केवळ जळगाव वनविभागातच १२ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
भुसावळ तालुक्यात नुकताच बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यापूर्वी वाघांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत.
एकीकडे वाघ लुप्त होत असताना जळगाव व यावल वनक्षेत्रात वाघांची संख्या वाढत आहे. यावर वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र निर्माण करणे अपेक्षित असताना त्याकडे वनविभाग व शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सातत्याने वाघांचे मृत्यू होण्याचे प्रकार घडत आहेत.
गत दहा वर्षात ५ वाघांचे मृत्यू झाले असून त्यात एका बछड्याचाही समावेश आहे. २००९ च्या काळात कुºहा वढोदा रस्त्यावर पट्टेदार वाघाचा एक महिन्याचा छावा अपघातात दगावला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१६ रोजी वायला शिवारात १५ वर्षांचा पट्टेदार वाघ तोंड फाटलेल्या अवस्थेत मृत आढळून आला होता.
२३ मार्च २०१८ सुकळी शिवारात १६ वर्ष वयाची वाघीण मृत्यू पावल्याचे आढळून आले. तर यावल वनविभागाच्या हद्दीतही तिढ्या भागात वाघीणीची हत्याचा झाल्याची घटना घडली होती. मात्र ती सिद्ध होऊ शकली नाही.
सन २०१८ मध्येच मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णा नदीपात्रात वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. शेतीच्या कुंपणातील विद्युत प्रवाहाचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे आढळले होते.
उपवनसंरक्षक डी.डब्लू.पगार यांनी सांगितले की, बहुतांश बिबटे हे वनक्षेत्राच्या बाहेर स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे बुद्धपौर्णिमेला केल्या जाणाऱ्या प्राणी गणनेतही हे बिबटे पाणवठ्यांवर आढळून येत नाहीत.
२०१६-१७ मध्ये ५, २०१७-१८ मध्ये ३ बिबटे आढळून आले होते. तर २०१८-१९ मध्ये एकही बिबट्या आढळून आला नव्हता. तर वनविभागाने २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रत्येकी १- १ व २०१८-१९ मध्ये २ बिबटे जेरबंद केले. पारोळा व जामनेर येथे विहीरीत पडलेल्या बिबट्यांना बाहेर काढले होते.
जिल्ह्यात सुमारे ४० बिबटे
प्राणीगणनेच्यावेळी पाणवठ्यावर आलेल्याच प्राण्यांची गणना होत असल्याने बिबट्यांची अचूक संख्या सांगणे कठीण असल्याचे मानले जाते.
मात्र तरीही जिल्ह्यात सुमारे ३० ते ४० बिबटे असल्याचा अंदाज वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
३ वर्षात १२ बिबट्यांचे मृत्यू
गत तीन वर्षात जिल्ह्यात केवळ जळगाव वनविभागात तब्बल १२ बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील काही नैसर्गिक तर काही हत्या आहेत. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ५ बिबट्यांचे मृत्यू झाले असून पारोळा तालुक्यात १, बोदवड तालुक्यात १, एरंडोल १, जळगाव तालुक्यात २, तर चाळीसगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव विमानतळावर जेसीबीच्या धक्क्याने बिबट्याच्या पिलाचा मृत्यू झाला होता. २०१६-१७ मध्ये २ बिबट्यांचा, २०१७-१८ मध्ये ६ बिबट्यांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी ५ नैसर्गिक मृत्यू होते. तर १ अपघात झाला होता. २०१८-१९ मध्ये ४ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील वनक्षेत्रात ७ वाघ
जिल्ह्यात वढोदा वनक्षेत्रात ६ तर यावल वनक्षेत्रात १ असे ७ वाघ आहेत. त्यात २-३ वाघीण आहेत. त्यामुळे प्रजनन प्रक्रिया सुरू राहून वाघांच्या संख्येत भविष्यात आणखी वाढ होणार आहे.