उष्माघाताने जळगाव जिल्ह्यात सात दिवसात पाच बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:26 PM2018-05-06T13:26:47+5:302018-05-06T13:26:47+5:30
तापमान ४५ अंशांवर
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ६ -: दिवसागणिक उन्हाचा पारा उंचावत असल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा तडाखा बसत आहे. आठ दिवसात पाच बळी गेले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असून तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एरव्ही दरवर्षी मे महिन्यात ४४ अंशावर पारा जातो. यंदा एप्रिलमध्येच ४४ अंशाच्या पुढे पारा गेल्याने जिल्ह्यावासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. २८ एप्रिल रोजी सर्वोच्च ४५ अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली.
२८ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील आसनगाव येथून लग्न सोहळा आटोपून परत येत असताना गजानन केशव टेंभुर्णे (५०, रा. जलाराम नगर, जळगाव) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्यानंतर ३० रोजी दहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथील विलास काशिनाथ सपकाळे (२४) या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ३ मे रोजी भुसावळ तालुक्यातील खडका येथील लक्ष्मण छगन बारेला (२५) या तरुणाचा आणि ४ मे रोजी दुपारी भुसावळ येथे अभय फेगडे या तरुण अभियंत्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ५ मे रोजी जमनालाल चेताजी रेगर (वय ५५ रा. लेवरिया, ता.राशमी, जि.चितोडगड, राजस्थान ह.मु. राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) या आईसक्रीम व्यावसायिकाचा दुपारी साडे बारा वाजता उष्माघाताने राणीचे बांबरुड येथे मृत्यू झाला.
दरम्यान, या पाचही मृत्यूबाबत वैद्यकीय सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नसून शवविच्छेदन अहलावालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईस, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
आठवडाभरातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२८ एप्रिल - ४५
२९ एप्रिल - ४४.४
३० एप्रिल - ४४
२ मे - ४२
३ मे - ४४
४ मे - ४३
५ मे - ४२