पाच गावांना मिळतेय अशुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 08:14 PM2019-07-11T20:14:30+5:302019-07-11T20:15:07+5:30

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

The five villages get unclean water | पाच गावांना मिळतेय अशुद्ध पाणी

पाच गावांना मिळतेय अशुद्ध पाणी

Next



नागरिकांचे आरोग्य धोक्यात : शुद्ध पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा
तासखेडा, ता. रावेर : तासखेडा गावासह नजीकच्या पाच गावांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार असून हा प्रकार म्हणजे नागरिकाच्या आरोग्याशी खेळ असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना केल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तासखेडा गावासह रणगाव, गहूखेडा, रायपूर, सुदगाव या पाच गावांसाठी सामुहिक पाणी पुरवठा योजना आहे. ही योजना रणगाव व गहूखेडा येथे कार्यान्वित आहे.
या योजनेच्या देखभाल व दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून २२ लाखांचा निधी गेल्या वर्षी खर्च झाला. काम सुरू असेपर्यंत ग्रामस्थांना मागील दोन वर्षे पाणी पुरवठा बंद होता. निधी योजनेवर खर्च केल्यानंतर सद्य स्थितीत योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे.
पाण्याचा जसाच्या तसा पुरवठा
योजनेचे पाणी तापी नदीपात्रातून उचलले जाते. सध्या नदीला पूर असल्यामुळे जसेच्या तसे पाणी नागरिकांना पुरविले जात आहे. अतिशय गढूळ पाणी नागरिकांना मिळत असते. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची टीका पाच गावांमधील नागरिकांकडून केली जात आहे.
काम कोणते केले
जिल्हा परिषदेकडून पाणी पाणी पुरवठा योजनेसाठी निधी देण्यात आला. तब्बल २२ लाखांचा हा निधी मिळाला. तरीही जर नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असेल तर नेमके या निधीतून काम कोणते केले? दोन वर्षांच्या कालावधीत कोणते काम झाले? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांकडून दुषित पाणी पुरवठ्या विरोधात ओरड सुरू झाल्याने या संदर्भात पाचही गावांच्या सरपंचांनी वरिष्ठांकडे कैफियत मांडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येत आहे.
सध्या होणारा पाणी पुरवठा असा आहे की, गुरेढोरेही हे पाणी पिण्यास धजावत नसल्याची परिस्थिती या पाच गावांमध्ये दिसून येत आहे. या पाच गावांना सध्या एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असतो. पाण्याची स्थिती लक्षात घेता, साथीच्या आजारांची लागण या परिसरात उद्भवण्याची भिती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
तीन महिन्यापूर्वी दिले पत्र
हा विषय गांभीर्याने घेऊन जिल्हा परिषद सदस्य कैलास यांच्याशी गहूखेडा सरपंचांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेकडे याबाबत तीन महिन्यापासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. तीन महिन्यापूर्वी पत्र दिल्यावरही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. अशी गंभीर स्थिती असताना दुर्लक्ष केले जात असल्याने सरपंच जे.के. पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
वरिष्ठांकडून दुर्लक्ष
पाणी समस्येचा हा विषय अतिशय गंभीर असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची टीका गावातील नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद सदस्याने पत्र देऊन दुर्लक्ष होत असेल तर ग्रामपंचायत सदस्यांना दाद देणार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
चौकशीची मागणी
ग्रामस्थांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून पाच गावांची ही पाणी पुरवठा योजना करण्यात आली. योजनेवर थोडा नव्हे तब्बल २२ लाखांचा निधी खर्च झाला आहे. त्यामुळे या योजनेची चौकशी केली जावी अशी मागणी आता होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ होत असल्याने याची गंभीर दखल घेतली जावी अन्यथा पाचही गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The five villages get unclean water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.