मुंबईहून जळगावला पावणेचार तास उशीरा आले विमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 06:48 PM2018-04-20T18:48:22+5:302018-04-20T18:48:22+5:30
विमानसेवा अखेर सुरू
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेली जळगाव-मुंबई विमानसेवा शुक्रवार २० एप्रिलपासून पुन्हा सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी मुंबईहून विमान सुमारे पावणेचार तास उशीरा पोहोचले. विमान सेवाबंद पडल्यानंतर ही सेवा सुरू होण्याचा पहिलाच दिवस होता. त्यात विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ही सेवा यापुढे अखंडपणे व वेळेवर सुरु रहावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
कंपनीने वेबसाईटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबईहून सकाळी ७.४० वाजता निघालेले विमान जळगावला ९.१५ ला पोहोचेल. तर जळगावहून मंगळ, बुध व गुरूवार असे तीन दिवस सकाळी ११.०५ वाजता निघून दुपारी १२.४५ वाजता मुंबईला पोहोचणार आहे. तर शुक्र, शनि व रविवार असे आठवड्यातील तीन दिवस दुपारी २.३० वाजता जळगावहून प्रवासी घेऊन हे विमान मुंबईला दुपारी ४.०५ ला पोहोचेल. त्यानुसार शुक्रवारी दुपारी २.३० वाजता हे विमान मुंबईकडे रवाना झाले. कंपनीच्या वेबसाईटवर तिकीट विक्रीही सुरू आहे. जळगाव-पुणे विमानसेवेबाबत मात्र अद्याप कंपनीकडून घोषणा झालेली नाही.
--------
पावणेचार तास उशीर
मुंबईहून ७.४० हून विमान निघून जळगावला ९.१५ला पोहोचणे अपेक्षित असताना पहिल्या दिवशी या फ्लाईटला विलंब झाला. त्यामुळे विमान जळगावला दुपारी १ वाजता पोहोचले. जळगावहून मात्र वेळेवर दुपारी २.३० वाजता विमान मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.