मुंबईहून जळगाव येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:23 PM2019-11-18T22:23:07+5:302019-11-18T22:23:15+5:30
दाट धुक्यांचा परिणाम : अहमदाबादहून येणारे विमानही विलंबाने
जळगाव : दाट धुक्यांमुळे घावपट्टीवर विमान उतरवितांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे मुंबईकडून सायंकाळी जळगावला येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द करण्यात येत आहे. तर अहमदाबादहूनही सकाळी येणारे विमान एक तास विलंबाने येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे वारंवार विमानसेवा रद्द झाल्याचा प्रकार घडल्यानंतर, आता गेल्या दोन दिवसापासून वातावरणात अतिशय दाट धुके पडत असल्यामुळे याचाही विमान सेवेवर परिणाम झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरतांना पायलटला किमान ५ किलोमीटर अंतरावरुन धावपट्टी दिसणे आवश्यक आहे. मात्र, जळगाव विमानतळ परिसरात अतिशय दाट धुके असल्यामुळे पायलटला ही धावपट्टी अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अहमदाबादहून सकाळी १०. २५ मिनिटांनी येणारे विमान, सकाळी साडेअकराला येत आहे. तसेच मुंबईवरुन येतानांही सायंकाळी अतिशय दाट धुके असल्यामुळे जळगावला विमान न येता मुंबईहून अहमदाबादला रवाना होत आहे. दोन दिवसापासून हा प्रकार घडत आहे.
अनेक प्रवाशांकडून तिकीट रद्द
गेल्या दोन दिवसापासून दाट धुक्यामुळे मुंबईकडून येणारी विमान सेवा रद्द होत असल्यामुळे, अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले जात असल्याची माहिती विमान कंपनीच्या सुत्रांनी दिली. तसेच यामुळे तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
विमान कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसापासून जळगावहून मुंबईला जाण्यासाठी विमानाला दोन तासांपर्यंत विलंब होत आहे. मुंबईला गेल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला जातांना विलंब होतो. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने, मुंबईहून कोल्हापूरसाठी स्वतंत्र विमान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईहून जळगावला लवकर विमान येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.