पुरात बेपत्ता इसमाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:10+5:302021-07-17T04:14:10+5:30
धरणगाव : निंभोरा येथील घटना धरणगाव : गुरुवारी पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या भागवत भिका पाटील (५५, रा. निंभोरा, ता. ...
धरणगाव : निंभोरा येथील घटना
धरणगाव : गुरुवारी पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या भागवत भिका पाटील (५५, रा. निंभोरा, ता. धरणगाव) याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी सकाळी आठ किमी अंतरावर गिरणा नदीच्या पात्रात आढळून आला.
मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात भागवत पाटील व त्याची पत्नी मालुबाई पाटील हे दाम्पत्य बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना निंभोरा, ता. धरणगाव येथे गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या पुरातून मालुबाई पाटील बचावल्या आहेत, तर दोन्ही बैलांचाही मृत्यू झाला आहे.
माहिती मिळताच धरणगावचे नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, मंडल अधिकारी अमोल पाटील, पोलीसपाटील गुलाब सोनवणे यांच्यासह पोलीस
उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, राजेंद्र कोळी, मोती पवार हे पथकासह दाखल झाले. याबाबत नायब तहसीलदार यांनी सांगितले की, निंभोरा परिसरातील खैरे नाला हा झारी नदीला जाऊन मिळतो. झारी नदी पुढे गिरणा नदीला जाऊन मिळते. शुक्रवारी सकाळी ५ वाजल्यापासून पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. पोलीसपाटील गुलाब सोनवणे यांनी ग्रामस्थांची तीन पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली. सकाळी ८.३० वाजता त्यांचा मृतदेह गिरणा नदी पात्राच्या कडेला आढळून आला. मृतदेहाचा जागेवर पंचनामा करण्यात आला.
भागवत पाटील यांच्याकडे ६ बिघे शेती होती. त्यांच्यावर ४ ते ४.५० लाखांचे विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई, दोन मुले, सुनबाई व नातू असा परिवार आहे. भागवत पाटील यांच्यावर निंभोरा येथे दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.