सांडपाण्यामुळे गिरणा, मेहरूण तलाव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:39 PM2019-08-14T12:39:14+5:302019-08-14T12:40:22+5:30
बेसुमार वाळू उपसा : शेतीच्या अतिक्रमणामुळे गिरणा लुप्त होण्याचा मार्गावर
जळगाव : एकीकडे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले खळाळून वाहत असताना दुसरीकडे मात्र गिरणेचे पात्र केवळ जळगाव शहराच्या प्रदुषित सांडपाण्यामुळे थोडेफार भरलेले दिसून येत आहे. शहरातील सर्व सांडपाणी गिरणेत जात आहे. गिरणेसह शहराचे वैभव समजल्या जाणाऱ्या मेहरुण तलावात देखील मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत असल्याने गिरणा व मेहरूणचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
शहरालगत गेलेल्या गिरणा नदीची स्थिती सध्यस्थिती बिकट झाली असून, एकेकाळी नेहमी खळाळणाºया गिरणेला गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात अपवादात्मक स्थितीत पूर आलेला असतो. त्यातच जळगाव शहराचे सर्व सांडपाणी विविध नाल्यांव्दारे गिरणेत सोडले जात असल्याने नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. जळगाव शहरासह नदीलगत असलेल्या सर्व गावांचे सांडपाणी देखील गिरणा नदीत जात आहे. प्रशासनासह पर्यावरणवादी संघटना असोत वा नदीकाठावर वसलेल्या गावांमधील ग्रामस्थ कोणालाही लुप्त होणाºया गिरणेची आर्त हाक ऐकू येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
नदीत वाळूचा ३ मीटरचा थर असणे आवश्यक
कोणत्याही नदीत पाणी जमीनीत शोषून घेण्यासाठी व पाण्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी नदीत ३ मीटरचा थर कायम ठेवणे गरजेचे आहे. सध्या गिरणा नदीत अनेक ठिकाणी हा थर दिसून येत नसून, पात्रात आता खडक लागायला सुरुवात झाल्याने धोक्याची पातळी गाठली आहे. तसेच नदीवर अनेक ठिकाणी बंधारे, धरणे तयार झाल्यामुळे वाळू तयार होण्याची नैसर्गिक प्रक्रिया थांबली आहे. नवी वाळू तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया खूप मोठी असते, त्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागतो.
त्यामुळे सध्या परिस्थितीत होणारा वाळूचा बेसुमार उपसा रोखणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत भुवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले आहे़
मेहरुण तलावातही मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण
शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावातही गिरणेप्रमाणेच आजूबाजुच्या वस्तीतून मोठ्या सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. याबाबत अनेक पर्यावरणवादी संघटना व पर्यावरण प्रेमींकडून मनपा प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी करून देखील कुठलीही कार्यवाही मनपाकडून करण्यात आलेली नाही. मेहरूण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने बांधकाम होत आहे. तसेच अनेक फ्लॅटसह काही घरांचे सांडपाणी थेट तलावात सोडले जात आहे. यामुळे तलावाचे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. यासह मेहरूण तलाव परिसरात एकेकाळी मोठी वनराई व त्यामुळे विविध प्रकारच्या पशू-पक्ष्यांचा अधिवास होता. मात्र मनपाने या परिसरात होणाºया वृक्षतोडीकडे दूर्लक्ष केल्याने पर्यावरण धोक्यात आले असून येथील जैवविविधताही धोक्यात आली आहे.
भूजल पातळीही खालावली
गिरणातील वाळू उपशामुळे भूजल पातळीत घट होत असून, उन्हाळ्यात गिरणा लगतच्या गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. जानेवारी, फेब्रुवारीपासूनच गिरणा पट्ट्यातील शेतांमधील ट्यूबवेल्स आटल्या जातात. सावखेडा ते पळसोद पर्यंत केळीसाठी ओळखला जाणाºया भागातील केळीचे उत्पादन देखील कमी होत जात आहे.
बेसुमार वाळू उपसा, नदी पात्रात अतिक्रमीत शेती
- गिरणा नदीपात्रातील वाळूला इतर नद्यांचा तुलनेत बांधकामासाठी सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये वाढणाºया बांधकामासाठी गिरणा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून त्यामुळे वाळू संपत येत आहे. सावखेडा शिवारापासून बांभोरी, आव्हाणे, फुपनगरी, नांद्रा,आमोदा ते गाढोदा अशा ४० किमी च्या गिरणा पट्ट्यात दररोज बेसूमार वाळू उपसा सुरु असल्याने नदीचे अस्तित्व संपण्यासारखेच झाले आहे.
-नदीपात्रात गावांलगतचा वाळू साठा कमी होत असल्याने माती लागत आहे तर काही ठिकाणी खडक, यामुळे अनेक आव्हाणे, फुपनगरी, बांभोरी, सावखेडा, गाढोदा, कानळदा भागात अनेक शेतकऱ्यांनी थेट नदीपात्रात शेती करायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढत जात आहे. मात्र, महसूल प्रशासन असो वा स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
भुयारी गटार योजनेमुळे जळगावचे सांडपाणी गिरणा नदीत जाणार नाही
जळगाव शहरातील सर्व सांडपाणी हे गिरणा नदीत जाते त्यामुळे गिरणेचे मोठ्या प्रमाणात जलप्रदुषण होत आहे. तसेच आसपासच्या अनेक कंपन्यांचे पाणी देखील गिरणेतच सोडले जात आहे. जळगाव शहरासाठी अमृत अंतर्गत मंजूर झालेल्या भुयारी गटारीचे काम दोन वर्षात पुर्ण झाल्यानंतर शहरातून जाणारे सर्व सांडपाणी गिरणेत जाण्यापासून रोखले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात गिरणेची काही प्रमाणात जलप्रदुषणापासून मुक्ती होवू शकते. दरम्यान, मृत्यु शय्येवर पडलेल्या गिरणेला वाचविण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.