प्रेमलता पाटील यांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:02+5:302021-01-02T04:14:02+5:30
जळगाव : नशिराबाद आरोग्य केंद्रांतर्गत जळगाव खुर्द उपकेंद्रात कार्यरत आरोग्यसेविका प्रेमलता संजय पाटील यांची राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारासाठी ...
जळगाव : नशिराबाद आरोग्य केंद्रांतर्गत जळगाव खुर्द उपकेंद्रात कार्यरत आरोग्यसेविका प्रेमलता संजय पाटील यांची राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना याबाबतचा ई-मेल गुरुवारी प्राप्त झाला. नाशिक विभागातून पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या त्या एकमेव आरोग्यसेविका आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा लवकरच सन्मान होणार आहे.
आदिवासी भागातील सेवेची दखल
प्रेमलता पाटील यांनी २००६ ते २०१३ पर्यंत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आदिवासी भागात पाड्यांवर सेवा दिली. या काळात त्यांनी लसीकरण, माता बालसंगोपन आदी विविध राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले. बालकांच्या पोषणाबाबत विशेष दक्षता घेतली. त्यानंतर त्यांनी रावेर तालुक्यातील चिनावल येथे सहा वर्षे सेवा दिली. त्यानंतर त्या वर्षभरापूर्वी जळगाव खुर्द येथे रुजू झाल्या होत्या. त्यांच्या १४ वर्षांच्या सेवेची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
काय आहे पुरस्कार
फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म १२ मे १८२० मध्ये फ्लॉरेन्स इटली येथे झाला होता. त्या उत्कृष्ट परिचारिका असल्याने त्यांचा जन्मदिवस हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि परिचर्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या परिचारिकांना त्यांच्या जन्मदिनी या पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. त्यानुसार नाशिक विभागातून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यात प्रेमलता पाटील यांची निवड झाली आहे.
कोट
पुरस्कारासाठी निवड होणे ही खूप मोठी आनंदाची बाब आहे. कुटुंबाचा यात खूप मोठा वाटा आहे. आदिवासी भागात कुटुंबापासून दूर राहून केलेल्या सेवेचे हे फळ मिळाले.
- प्रेमलता पाटील, आरोग्यसेविका