वाकडीच्या घटनेवर राज्याचे लक्ष केंद्रीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:19 PM2018-06-15T23:19:56+5:302018-06-15T23:19:56+5:30
मुलांवर अत्याचार प्रकरण
जळगाव: जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मनाई करूनही विहिरीत पोहोल्याबद्दल मातंग समाजाच्या मुलांना अमानुषपणे मारहाण करून नग्न धिंड काढल्याचे प्रकरण चांगलेच तापले असून या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्याची दखल घेत अनुसुचीत जाती जमाती आयोग, बालहक्क आयोग तसेच विविध मंत्री शनिवार, १६ जून रोजी औरंगाबाद मार्गे वाकडी येथे भेट देणार आहेत.
महाराष्टÑ राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजयकुमार कांबळे, सदस्य (विधी) न्या.सी.एल.थूल, सदस्य (सेवा) मधुकर गायकवाड हे शुक्रवारी रात्रीच मुंबईहून जळगावाला येण्यासाठी रवाना झाले असून शनिवार, १६ जून रोजी सकाळी ८ वाजता जळगाव येथील सर्कीट हाऊस येथून डी.व्ही.कारने जामनेरकडे रवाना होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता वाकडी गाव व घटनास्थळाला भेट तसेच पिडीतांच्या घरी भेट देणार असून पोलीस तपास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी पुढील कारवाईबाबत चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत.
बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे हे देखील दि.१६ रोजी औरंगाबादहून सकाळी ८वाजता निघून वाकडी ता.जामनेर येथे भेट देऊन अल्पवयीन बालकांवरील अत्याचारासंदर्भात अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. याप्रसंगी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व बाल कल्याण समिती पदाधिकारी घटनेबाबतचा सविस्तर अहवाल अध्यक्षांना सादर करतील.
तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे देखील शनिवार १६ मे रोजी सकाळी १० वाजता औरंगाबाद मार्गे वाकडी येथे भेट देणार आहेत. यावेळी ते पिडीत व जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याशी चर्चा करतील.
पालकमंत्र्यांची जळगावात येऊनही वाकडीकडे पाठ
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील शिक्षक मतदार संघ निवडणुकीसंदर्भात भेटीगाठींसाठी शनिवार १६ जून रोजी जळगावात आहेत. शुक्रवारी रात्रीच उशीरा ते जळगावात पोहोचणार असल्याचे त्यांच्या अधिकृत दौऱ्यात म्हटले आहे. मात्र जळगावातील भेटीगाठी आटोपून ते धरणगाव, अमळनेर व तेथून धुळे मार्गे मुंबईला रवाना होणार आहेत. या दौºयात वाकडीला भेट देण्याचे समाविष्ट नसल्याचे व शुक्रवारी रात्री ७.३० पर्यंत दौºयात काहीही बदल आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पालकमंत्री जळगावात येऊनही वाकडीकडे पाठ फिरवून निघून जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.