मारवड परिसरात चारासंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:42+5:302021-08-12T04:20:42+5:30
मारवड मंडळात जून व जुलै हे दोन महिने कोरडे गेल्याने दुबार, तिबार पेरणीसह दुष्काळी परिस्थिती उद्भवून प्रचंड चाराटंचाई निर्माण ...
मारवड मंडळात जून व जुलै हे दोन महिने कोरडे गेल्याने दुबार, तिबार पेरणीसह दुष्काळी परिस्थिती उद्भवून प्रचंड चाराटंचाई निर्माण झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मुबलक व स्वस्त उपलब्ध असलेला चारासाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले आहे. त्याचा परिणाम दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनावर होऊन मोठीच आर्थिक झळ बसत आहे.
छावण्या सुरू करण्याची मागणी
त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांनी नुकतेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पीकविम्यासह चारा छावण्या सुरू करण्याबाबत निवेदन दिले आहे. त्याची शासनाने त्वरित दखल घेऊन पशुधन वाचविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पारोळा तालुक्यातून चारा
सद्यस्थितीत जनावरे वाचविण्यासाठी मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील शेतकरी पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हान येथून दोन हजार सहाशे रुपये प्रतिटन इतक्या चढ्या भावाने ऊसाचा चारा मागवत आहेत. यासाठी दहाबारा शेतकरी एकत्र येऊन ट्रक भरून ऊस चारा मागवत आहेत.
पशुखाद्याचे भाव दुप्पट
दुधाळ जनावरांसाठी अत्यावश्यक असलेले सरकी पेंड व ढेप, मका भरडा, उडीद चुनी, सुग्रास कांडी आदी पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असल्याने तेही परवडत नाहीत. वर्षभरापासून सर्व प्रकारच्या पशुखाद्याचे भाव दुप्पट झाले आहेत. मात्र, दुधाचे भाव जैसे थे आहेत.
----
जून, जुलैपर्यंत पुरेल इतका चारासाठा जनावरांसाठी करून ठेवला होता. ऑगस्टमध्ये नवीन हिरवा चारा उपलब्ध होतो. मात्र पावसाअभावी बांधावर गवतदेखील उगवलेले नाही
- उमाकांत पाटील शेतकरी.