गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा फटाक्यामुळे जळाला; २० ते ३० हजार रुपयांचे नुकसान
By विजय.सैतवाल | Published: November 14, 2023 02:46 PM2023-11-14T14:46:42+5:302023-11-14T14:46:59+5:30
रेमंड चौकानजीक असलेल्या समाधान प्लास्ट कंपनी समोर पत्र्याच्या शेडमध्ये गुरांसाठी लागणारा चारा साठवून ठेवण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरांसाठी साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर जळता फटाका उडाल्याने ट्रकभर चारा जळून खाक झाला. यामध्ये २० ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग मंगळवार, १४ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास लागली.
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रेमंड चौकानजीक असलेल्या समाधान प्लास्ट कंपनी समोर पत्र्याच्या शेडमध्ये गुरांसाठी लागणारा चारा साठवून ठेवण्यात आला होता. त्याच्या आजूबाजूला कोणीतरी फटाके फोडले व जळता फटाका चाऱ्यावर उडाला. त्यामुळे चाऱ्याने पेट घेतला व जवळपास ट्रकभर चारा जळून खाक झाला.
घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल ललित नारखेडे व किरण पाटील हे पोहोचले. त्यांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यावेळी एक बंब दाखल झाला व आग नियंत्रणात आणली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.