धुक्यात फसली गाडी अन् जनावरांची सुटका झाली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:07 PM2020-12-14T16:07:02+5:302020-12-14T16:09:16+5:30
धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उतरून चारचाकी फसली आणि मंगरूळ येथील युवकांच्या प्रयत्नाने गुरांची सुटका झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील निसर्डी , बहादरवाडी व हेडावे येथून गुरे कोंबून घेऊन जाणारी चारचाकी धुक्यामुळे रस्त्याच्या कडेला उतरून फसली आणि मंगरूळ येथील युवकांच्या प्रयत्नाने गुरांची सुटका झाली. वाहनचालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. १४ रोजी सकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान (एमएच २३ एन ५५४१) हे वाहन मंगरूळ गावाजवळ धुक्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला जाऊन फसले. वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, भटू बाविस्कर, भाजप युवा मोर्चाचे राकेश पाटील, मिलिंद पाटील, अनिल पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील हे धावत गेले असता त्यांना प्रवाशी चारचाकीत चार गायी कोंबलेल्या आढळून आल्या. लोकांची गर्दी जमते, ते पाहून चालक पळून गेला.
मंगरुळच्या युवकांनी गायींची सुटका केली, तोपर्यंत हेडावे येथील गायीचे मालक गोकुळ धनजी पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्यांच्या गायी ओळखल्या आणि उर्वरित दोन गायी निसर्डी येथील विनोद मोतीलाल सोनवणे आणि बहादरवाडी येथील मनोहर युवराज पाटील यांच्या असल्याची ओळख पटली.
पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे, पोलीस योगेश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन गुरांना शिरूड गोशाळेत रवाना केले आणि वाहन पोलिस स्टेशनला जमा केले. गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला वाहनचालक विरुद्ध चोरीचा आणि गुरे कोंबल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल भरत ईशी करीत आहेत.