दुकानांची वेळ वाढविण्यासह इतर आस्थापनांना परवानगीसाठी पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:44+5:302021-05-30T04:14:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यामुळे निर्बंधांना शिथिलता मिळत अत्यावश्यक सेवेतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात आली आहे. त्यामुळे निर्बंधांना शिथिलता मिळत अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा वाढविण्यासह इतर आस्थापनांनाही परवानगी मिळण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. राज्य शासनाकडून १ जूननंतरची नियमावली जाहीर होईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने विविध उपाययोजनांना वेग आला. यामध्ये जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन या सर्वांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रयत्न केल्यानंतर आता जिल्ह्यातील दररोजची रुग्ण संख्या २००च्या खाली आहे. राज्यामध्ये ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली, त्या ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी जिल्ह्यात अनेक बाबींना शिथिलता मिळावी याविषयी मागणी केल्याचे सांगितले.
नियमावलीकडे लक्ष
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने व्यवहार सुरळीत व्हावे अशी अपेक्षा व्यापारी वर्गासह सर्वजण करीत आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी सात ते ११ यावेळेत परवानगी आहे. ही वेळ आता वाढवून मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. यासोबतच अत्यावश्यक सेवेतील व्यवहारांव्यतिरिक्त इतरही आस्थापनांना परवानगी मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मात्र, हे सर्वच व्यवहार एकसोबत सुरू होतील असे नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दुकानांची वेळ वाढविणे अथवा इतर आस्थापनांना परवानगी देणे या विषयीचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात यावे, अशी मागणी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
१ जूननंतर दुकानांच्या वेळा वाढतील किंवा इतर दुकाने सुरू होतील की नाही हे आता राज्य शासन नियमावली जाहीर करेल त्यानंतर स्पष्ट होणार आहे.