जिल्ह्यात निर्बंधाचे पालन करा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:15 AM2021-05-16T04:15:32+5:302021-05-16T04:15:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा प्रशासनाने आता लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सोमवारपासूनच क्रॅकडाऊन (कडक कारवाई) करण्याचा निर्णय घेतला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा प्रशासनाने आता लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सोमवारपासूनच क्रॅकडाऊन (कडक कारवाई) करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाहेर फिरण्यासाठी नागरिक जी कारणे सांगतात ही पटणारी नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला. तसेच नागरिकांना सकाळी ११ च्या आत आपली कामे आटोपून घरीच राहण्याचे आवाहनदेखील केले आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, ‘जळगाव जिल्ह्यात अपेक्षित रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे समोर आले आहे. नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण बाहेर फिरत आहेत. कोविड रुग्णांचे नातेवाईक काही ठिकाणी रुग्णांना भेटायला जात आहेत. तसेच लसीकरणासाठी गर्दी होत आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार एका बैठकीत करण्यात आला. आता शासनाने दिलेल्या मुदतीत वाढ केली आहे. हा पंधरा दिवसांचा कालावधी आता कडकपणे राबविला जाईल. यात आता नवीन निर्बंध नसतील. मात्र जे निर्बंध आहेत त्यांचे पूर्ण पालन केले जावे.’
जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, ‘राज्य शासनाने १ जूनपर्यंत कडक निर्बंध कायम ठेवले आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख सुरू आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील १५ दिवस शासनाच्या नियमांचे कठोर पालन केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जिल्हाभरात पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी फक्त अत्यावश्यक वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडावे, तसेच दररोज लागणारी औषधे, फळे, भाजीपाला, किराणा माल तसेच अन्य बाबी खरेदी करण्यासाठी शहरातील मुख्य बाजारात गर्दी करू नये. या सर्व वस्तू घराजवळील दुकानांमधूनच खरेदी कराव्यात. जळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठेचे १४ ते १५ ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी वस्तूंच्या खरेदीसाठी सुभाष चौक, घाणेकर चौक या परिसरात येऊ नये. आपल्या वॉर्डातच असणाऱ्या भाजीविक्रेत्यांकडून या वस्तू खरेदी कराव्यात, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
३४०० पोलीस आणि मनपा, नपा कर्मचारीही तैनात
जिल्ह्यात नियमांचे कडक पालन केले जात आहे की नाही यासाठी संपूर्ण पोलीस दलच कामाला लावले जाणार आहे. त्यात ३४०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त केले जातील. तसेच त्यांच्या सोबतीला महापालिका आणि नगरपालिकेचे कर्मचारीदेखील असतील. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
सकाळी ११ नंतर संपूर्ण कर्फ्यू
जळगाव जिल्ह्यात सकाळी ११ नंतर अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा वगळता संपूर्ण कर्फ्यू असेल. नागरिकांनी लहान-मोठ्या कारणांसाठी बाहेर जाऊ नये, अत्यावश्यक सेवेला मुभा असेल मात्र नियमित कामे ही सकाळी ७ ते ११ च्या आतच करून घ्यावीत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा डॉ. मुंढे यांनी दिला. ऑटो रिक्षा नियम पाळत नाहीत असे आढळून आल्यास आरटीओ आणि पोलीस संयुक्त कारवाई करतील. पंधरा दिवसांत परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत असतील, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाणदेखील उपस्थित होते.