मुहूर्तावर भाव वाढले तरी खरेदीला ‘सुवर्ण झळाळी’; सोने-चांदी खरेदीचा प्रचंड उत्साह

By विजय.सैतवाल | Published: October 22, 2022 03:49 PM2022-10-22T15:49:28+5:302022-10-22T15:49:41+5:30

सुवर्ण बाजार गजबजला, सोन्यात १२०० तर चांदीच २३०० रुपयांची वाढ

Following Vijayadashami, the prices of gold and silver have also increased on the occasion of Dhantrayodashi. | मुहूर्तावर भाव वाढले तरी खरेदीला ‘सुवर्ण झळाळी’; सोने-चांदी खरेदीचा प्रचंड उत्साह

मुहूर्तावर भाव वाढले तरी खरेदीला ‘सुवर्ण झळाळी’; सोने-चांदी खरेदीचा प्रचंड उत्साह

googlenewsNext

जळगाव : विजयादशमी पाठोपाठ धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरदेखील सोने-चांदीचे भाव वाढले तरी खरेदीसाठी शनिवारी मोठा उत्साह दिसून आला. त्यात धनत्रयोदशीचा मुहूर्त शनिवारसह रविवारीदेखील असल्याने या दिवशीदेखील मोठी खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शनिवारी एकट्या  सुवर्णनगरी जळगावात १५ कोटींच्यापुढे उलाढात झाल्याचा  अंदाज असून राज्यात हा आकडा दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात गेल्याचा अंदाज आहे. 

दरम्यान, शनिवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात एक हजार २०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. तसेच चांदीच्याही भावात दोन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ती ५९ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली. साडेतीन मुहूर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीसह सोने-चांदी खरेदीलाही मोठे महत्त्व दिले जाते. यासोबतच धनत्रयोदशीलादेखील सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने या दिवशी एक ग्रॅम सोने तरी खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. तो उत्साह यंदाही कायम तर आहेच, शिवाय यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने खरेदी अधिक वाढली असल्याचे चित्र सुवर्णबाजारात आहे.

ऐन मुहूर्तावर भाव वधारले

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे भाव कमी होत गेले. त्यामुळे खरेदी वाढणार असल्याचा अंदाज होता. मात्र शनिवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या भावात वाढ झाली. तरीदेखील खरेदीवर कोणताही परिणाम  जाणवला नाही. मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीला खरेदीचे प्रमाण अधिक वाढले असल्याचेदेखील सांगितले जात आहे.

सध्या कलाकुसरीच्या दागिन्यांना अधिक पसंती असल्याने मनाजोगे दागिने भेटण्यासाठी ग्राहकांकडून बुकिंगदेखील करून ठेवली गेली होती. रविवारीदेखील खरेदीचा उत्साह असाच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन दिवसात राज्यभरात सोन्यामध्ये चार ते पाच हजार कोटींची उलाढाल  होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

सुवर्णनगरी जळगावच नव्हे तर राज्यभरात सोने-चांदी खरेदीसाठी प्रचंड उत्साह आहे. धनत्रयोदशीला राज्यभरात ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शनिवारी मोठा प्रतिसाद मिळाला व त्यात  रविवारीदेखील मुहूर्त असल्याने या दिवशीदेखील मोठी खरेदी होऊ शकते. शनिवारी जळगावात १५ कोटींपेक्षा अधिक उलाढात झाल्याचा अंदाज आहे.  - भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक.

Web Title: Following Vijayadashami, the prices of gold and silver have also increased on the occasion of Dhantrayodashi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं