ज्या भागात जे पिकते ते खा व सदृढ आयुष्य जगा - आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:25 PM2018-11-26T12:25:15+5:302018-11-26T12:25:30+5:30

खाद्य कला, व्यायाम, पुरेशी झोप, योग्य वजन व आहार हीच निरोगी आयुष्याची पंचसूत्री

The food in the area where food is eaten and live a healthy life - food expert Rijuta Divekar's advice | ज्या भागात जे पिकते ते खा व सदृढ आयुष्य जगा - आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला

ज्या भागात जे पिकते ते खा व सदृढ आयुष्य जगा - आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला

googlenewsNext

जळगाव : कोणत्या पदार्थातून किती ‘प्रोटीन, व्हिटॅमीन, कार्बोहायड्रेड, कॅलरीज’ मिळेल याचा विचार न करता दररोज डाळ, भात, भाकरी, पोळी, फळ आणि स्थानिक पदार्थासह त्या-त्या हंगामात येणारे व घरात पारंपारिकरित्या तयार होणाऱ्या आहाराचे सेवन केल्यास प्रत्येक व्यक्ती सदृढ आयुष्य जगू शकते, असा सल्ला प्रसिद्ध आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी रविवारी जळगावात दिला.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे २५ नोव्हेंबर रोजी कांताई सभागृहात ‘आरोग्यम् धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना दिवेकर यांनी हा सल्ला दिला. या वेळी प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, डॉ. भावना जैन, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दिपिका चांदोरकर उपस्थित होते.
घरातील वजन काटा घालवा
सदृढ आरोग्यासाठी वजन कमी केले पाहिजे, असा हल्ली समज झाला आहे. त्यामुळे जो-तो वजन कमी करण्याच्या मागे लागला असून घरी सारखे-सारखे स्वत:चे वजन करीत असतो. तसे न करता आपण स्वत:च आपले वजन ओळखा. काम केल्यानंतरही ज्याचे हात-पाय दुखत नाही, तणाव येत नाही, कोणी काही बोलले तरी शांत राहू शकतो अशी ज्याची लक्षणे आहे त्या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे असे समजा, असे निरोगी शरीराचे साधे गणित दिवेकर यांनी या वेळी मांडले. घरात दर आठवड्याला पूर्वी रद्दी मोजली जायची, आता आपण स्वत:ला मोजतो, त्यामुळे आपण कोण आहे, हे ओळखा व घरातील वजन काटा आधी विकून टाका, असा सल्लाही त्यांनी दिला.
शेती, स्वयंपाक घर व आजी यांचे नाते जोडा
प्राणी जातीमध्ये ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच मानवाला आज खाण्याच्या-पिण्याच्या बाबतीत मार्गदर्शन घ्यावे लागते. इतर कोणत्याही प्राण्याला ‘डायट’ करावे लागले का, असा प्रश्न दिवेकर यांनी उपस्थित केला. खाण्या-पिण्याच्या बाबतीत ज्या भागात जे पिकते अर्थात स्थानिक पदार्थ सेवन करण्यासह प्रत्येक हंगामातील खाद्य व घरात आपली जी संस्कृती आहे ते पदार्थ सेवन करा आणि उत्तम आरोग्याचे धनी व्हा, असा सल्लाही त्यांनी योग्य आहारासंदर्भात दिला. यात शेती, स्वयंपाक घर आणि घरातील आजी यांचे नाते जोडून आहार घेतल्यास आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती सदृढ राहू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपली खाद्य संस्कृती भविष्याचा वेध घेणारी
आपल्याकडे पिकणारे ऊस, हळद-दूध, केळी, मका हे खाणे आपण विसरत चाललो आहे, मात्र हेच पदार्थ सेवन केल्यास त्याचे गुणकारी घटक किती फायदेशीर आहे, हे बाहेरून येऊन व पैसे घेऊन कोणी सांगितले तर आपल्याला त्याचे मोल कळते, अशी खंतही दिवेकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणत्या पदार्थात किती जीवनसत्व व इतर काय-काय आहे याचा विचार न करता तो जो पदार्थ आहे, तोच पदार्थ म्हणून त्याचे सेवन करा, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्याकडील प्रत्येक खाद्य पदार्थाने शरीरास मोठे फायदे होतात. आपल्या या खाद्य संस्कृतीमुळेच प्रत्येकाचे भविष्य निरोगी राहू शकते, असेही दिवेकर यांनी नमूद केले. खाणे हीदेखील एक कला असून ती संभाळा, असेही आवाहन त्यांनी केले.
योग्य व्यायाम करा
व्यायाम करतानाही तो किती वेळ व कोणता करावा या विषयी मार्गदर्शन करताना दिवेकर म्हणाल्या की, सायकल चालविणे, पोहणे (जलतरण), सूर्यनमस्कार, चालणे व विविध आसने असे नियमित व्यायाम केल्यास शरीराचे वजनही वाढत नाही, असे सांगत स्वत:चे काम स्वत: करा, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका, असा सल्लाही दिवेकर यांनी दिली. धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ देता येत नाही, असे प्रत्येक जण म्हणतो, मात्र दररोज थोडातरी वेळ यासाठी काढा, असेही दिवेकर म्हणाल्या.
रात्री साडे आठनंतर टिव्ही, मोबाईल करा बंद
सदृढ आरोग्यासाठी पुरेसी झोपही महत्त्वाची आहे, मात्र हल्ली टिव्ही, मोबाईल यामुळे अनेकांच्या झोपा उडाल्या असल्याचे दिवेकर म्हणाले. त्यामुळे घरात रात्री साडे आठ वाजेनंतर टिव्ही, मोबाईलचा वापर टाळा व घरात संवाद वाढविण्यासह पुरेसी झोप घ्या, यातून प्रत्येक व्यक्ती निरोगी आयुष्य जगू शकले, असा सल्ला त्यांनी दिला. शेवटी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना दिवेकर यांनी उत्तरे दिला.
दीपक चांदोरकर यांनी प्रास्ताविक केले तर अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.
या वेळी वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींसह विद्यार्थी व महिलादेखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ऋजुता दिवेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: The food in the area where food is eaten and live a healthy life - food expert Rijuta Divekar's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव