‘अतिक्रमण हटाव’साठी रहिवाशी मनपात, आयुक्त मात्र बाहेर !
By सुनील पाटील | Published: March 28, 2023 07:05 PM2023-03-28T19:05:31+5:302023-03-28T19:05:39+5:30
दालनाबाहेर मांडला ठिय्या : लक्ष्मीनगरातील महिला, पुरुष संतप्त
जळगाव : शहरातील कानळदा रोडलगत असलेल्या लक्ष्मीनगरातील अतिक्रमण हटविण्याची तक्रार घेऊन शेकडो महिला, पुरुष महापालिकेत आयुक्तांकडे आले, मात्र आयुक्त बाहेर असल्याने त्या कार्यालयात आल्या नाहीत, त्यामुळे या लोकांनी दालनाच्या बाहेर ठिय्या मांडून आपला संताप व्यक्त केला. बहुप्रतिक्षेनंतरही आयुक्त न आल्याने निराश होऊन त्यांना माघारी फिरावे लागले.
कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगरातील गल्ली नं.१ मध्ये अनेक जुने झाडे तोडून त्याठिकाणी अतिक्रमणात घरे, टपऱ्या व पार्टीशनची दुकाने तयार झालेली आहेत. यामुळे रहिवाशांना वाहतुकीचा त्रास होत आहे. त्या कारणावरुन वाद निर्माण होऊन दररोज कडाक्याचे भांडणे होत असतात. भविष्यात मोठी घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संभाव्य धोका लक्षात घेता हे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी शेकडो रहिवाशी मंगळवारी महापालिकेत आले होते.
आयुक्तांना निवेदन देण्यासाठी त्यांनी दालनाबाहेर तासभर प्रतिक्षा केली. आयुक्त येणार नसल्याचे समजताच त्यांनी ठिय्या मांडला. काही जणांनी आयुक्तांच्या निवासस्थानी जाण्याचा पवित्रा घेतला होता. अतिक्रमण हटवून आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शोभा डीडूल, चंदा आरसूळ, वर्षा कदम, जयश्री कदम, विठाबाई पाटील, अश्विनी कळसुले, राधा पाटील, रोशनी बडगुजर, शहाजी थोरवे, बन्सीलाल पाटील, सचिन कदम, सुनील जैन, विजय आंबेकर यांच्यासह असंख्य रहिवाशी उपस्थित होते.