जळगाव जिल्ह्यात चार वर्षानंतर पहिल्यांदाच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
By Ajay.patil | Published: October 1, 2023 07:56 PM2023-10-01T19:56:43+5:302023-10-01T19:58:53+5:30
जिल्ह्यात सरासरीचा ९२ टक्के पाऊस: मान्सूनही परतीच्या मार्गावर, पारा ३४ अंशावर.
अजय पाटील, जळगाव - जून ते सप्टेंबर हे पावसाचे चार महिने संपले असून, सलग चार वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या ९२ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. २०१९ ते २०२२ या चार वर्षात जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यंदा जरी कमी पाऊस झाला असला तरी समाधानकारक पाऊस म्हणता येणार आहे.
एलनिनोचा प्रभाव असताना, जिल्ह्यात ९२ टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा आहे. त्यामुळे एलनिनोच्या प्रभाव असलेल्या वर्षात जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ९२ टक्के पाऊस चांगला मानला जात आहे. शासकीय नोंदणीप्रमाणे १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान झालेला पाऊस हा अधिकृत मान्सूनचा पाऊस गृहीत धरला जातो. त्यामुळे शासकीय दृष्ट्या ३० सप्टेंबरनंतर पावसाळा संपला असल्याने, जिल्ह्यात चार महिन्यात ५८१ मिमी इतका सरासरी पाऊस झाला आहे.
- जिल्ह्यात एकूण होणारा पाऊस - ६३२ मिमी
- जिल्ह्यात झालेला पाऊस - ५८१ मिमी