स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच मनपाची पहिल्या दोन महिन्यात १६ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 04:34 PM2022-05-28T16:34:09+5:302022-05-28T16:35:04+5:30
Jalgaon : महापालिकेकडून वसुलीची रक्कम वाढावी म्हणून दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना १० टक्के सवलत दिली जाते. तरी देखील महापालिकेची वसुली ही ८ कोटी रुपयांच्या वर जात नाही.
- अजय पाटील
जळगाव : महापालिकेची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर किंवा तत्कालीन नगरपालिका असतानाही जेवढी वसुली झाली नव्हती, तेवढी (तब्बल १६ कोटी) वसुली मनपाने यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच पहिल्यांदाच करून दाखवली आहे. महापालिकेने केलेली ही रेकॉर्डब्रेक वसुली असून, एप्रिल व मे महिन्यात महापालिकेची वसुलीचा आकडा ७ ते ८ कोटींपर्यंतच गेलेला असतो. विशेष म्हणजे महापालिकेने या दोन्ही महिन्यात मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना मालमत्ताकरावर १० टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील झालेले रेकॉर्डब्रेक वसुली, अनेक वर्षांपासून आर्थिक संकटातून जात असलेल्या मनपाला ‘बुस्ट’देण्याचे काम करणार आहे.
महापालिकेकडून वसुलीची रक्कम वाढावी म्हणून दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात मालमत्ताकराची रक्कम भरणाऱ्या नागरिकांना १० टक्के सवलत दिली जाते. तरी देखील महापालिकेची वसुली ही ८ कोटी रुपयांच्या वर जात नाही. मात्र, यंदा ही वसुली तब्बल १६ कोटींपर्यंत गेली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत मनपाची वसुली दुपट्टीने वाढली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दोन महिन्यात एवढी वसुली झाल्यामुळे उर्वरित १० महिन्यात ही वसुली ८० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यातच ३१ मेपर्यंत जळगावकरांना मालमत्ताकरात १० टक्के सुट दिली जाणार असून, या चार दिवसात महापालिकेची वसुली दीड ते दोन कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असून, दोन महिन्यातील वसुलीची रक्कम १८ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
फेरमूल्यांकनामुळे वाढली रक्कम
महापालिकेने गेल्या तीन वर्षांपासून शहरातील वाढीव मालमत्तांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले होते. यामध्ये महापालिकेच्या १९ हजारहून अधिक नवीन मालमत्ता आढळल्या, तर एकूण ८८ हजार मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तांमध्ये बदल केल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेने या वर्षांपासून मालमत्तांमध्ये वाढ करणाऱ्या मालमत्ताधारकांकडून वाढीव कराची वसुली सुरू केली असून, यामुळेच पहिल्या दोन महिन्यात मनपाची वसुली १६ कोटींपर्यंत पोहचली आहे. दरम्यान, महापालिकेच्या मालमत्ताकराची वर्षाची वसुलीदेखील ५२ कोटींपासून ८० ते ८५ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असून, आता महापालिका प्रशासनाने नागरिकांना मूलभूत सुविधा देताना, कर्ज व आर्थिक परिस्थितीचे रडगाणे सुरू करू नये, असे मत सर्वसामान्य जळगावकरांकडून व्यक्त केले जात आहे.
गेल्या पाच वर्षातील एप्रिल व मे महिन्यात झालेली वसुली
वर्ष - झालेली वसुली
२०१८ - ५ कोटी
२०१९ - ६ कोटी
२०२० - ००
२०२१ - ८ कोटी
२०२२ - १६ कोटी
प्रभाग समितीनिहाय झालेली वसुली
प्रभाग समिती १ - ५ कोटी ३७ लाख २१ हजार
प्रभाग समिती २ - २ कोटी ४१ लाख ८१ हजार
प्रभाग समिती ३ - ३ कोटी २८ लाख ५४ हजार
प्रभाग समिती ४ - ४ कोटी ९६ लाख ८४ हजार