विद्यार्थी संख्यावाढीसाठी विभागप्रमुखांना शाळा दिली दत्तक, जळगावात मनपा शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा
By विजय.सैतवाल | Published: March 10, 2023 08:20 PM2023-03-10T20:20:49+5:302023-03-10T20:21:16+5:30
Jalgaon News: महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासह तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत.
- विजयकुमार सैतवाल
जळगाव : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढण्यासह तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे शाळा दत्तक देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित विभागप्रमुखांना शाळांमधील सुविधांचा दर आठवड्याला आढावा घ्यावा लागणार आहे. तसे आदेश मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी काढले आहेत.
या संदर्भात आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरात विविध भागांमध्ये महानगरपालिका संचालित प्राथमिक शाळा असून त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना सर्व मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात शाळेमधील स्वच्छता, स्वच्छतागृहाची व्यवस्था, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यासह शाळेस आणखी काय सुविधा पुरवू शकतो तसेच बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत समस्येबाबतच विद्यार्थी संख्यावाढ होण्यासाठी व अनुषांगिक इतर बाबींची पाहणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मनपाच्या विभागप्रमुखांकडे प्रत्येकी एक शाळा दत्तक देण्यात येत असल्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ. गायकवाड यांनी काढले आहेत.
आयुक्तांकडे द्यावा लागणार अहवाल
शाळांची जबाबदारी सोपवित मनपाच्या शाळांची यादी देत त्यासमोर विभागप्रमुखांचे नाव नोंदवून त्यांच्याकडे त्या-त्या शाळेची जबाबदारी सोपविली आहे. यानुसार आता आठवड्यातून एक वेळेस संबंधित विभागप्रमुखाने शाळेस भेट देऊन त्या ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधा व वर नमूद केलेल्या बाबींची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल आयुक्त व शिक्षण विभागाच्या सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
....तर मुख्याध्यापक व विभागप्रमुखांवरही शिस्तभंगाची कारवाई
सर्व संबंधित मुख्याध्यापकांनी पाहणी करण्यास आलेल्या विभागप्रमुखांना सहकार्य करावे, असेही आदेशात म्हटले आहे. जे मुख्याध्यापक सहकार्य करणार नाही व जे विभागप्रमुख याबाबत कार्यवाही करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही या आदेशाद्वारे दिला आहे.