शिवसेना शिंदे गटात प्रवेशाची सरपंचाबाबत जबरदस्तीने घोषणा; मंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यक्रमातील प्रकार
By सुनील पाटील | Published: March 27, 2023 07:41 PM2023-03-27T19:41:27+5:302023-03-27T19:43:37+5:30
शिवसेनेच्या शिंदे गटात सरपंच प्रवेशाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
जळगाव : तालुक्यातील वडली येथील सरपंच युवराज गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यक्रमात जबरदस्तीने करण्यात आल्याचा प्रकार वावडदा येथे घडला आहे. सरपंचांनी तात्काळ पत्रक काढून याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वावडदा येथे रविवार दि.२६ रोजी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व शुभारंभाचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी पंचक्रोशीतील सरपंचांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सरपंच या नात्याने मलाही आयोजकांनी निमंत्रित केले होते, त्यानुसार मी तेथे उपस्थित राहिलो. परिसरातील सरपंचांचा सत्कार समारंभ होत असताना त्यात माझाही सत्कार करण्यात आला व त्याच वेळी मी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले.
मुळात मी फक्त सरपंच या नात्याने कार्यक्रमाला उपस्थित होतो. मी शिंदे गटात प्रवेशच केलेला नाही. मला न विचारता अशी घोषणा करण्यात आली. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यावरुन मला मनस्ताप होत असून माझ्या एकनिष्ठतेवर शंका उपस्थित केली जात आहे. विश्वासाने कोणी कार्यक्रमाला जात असेल व तेथे असा विश्वासघात होत असेल तर कोणी कार्यक्रमांना उपस्थित राहिल का?. मी वडली गावाचा सरपंच आहे. शिंदे गटाचा सदस्य देखील नाही. आम्ही पॅनल मिळून निवडणूक लढली आहे. शिंदे गटाचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. त्यामुळेच त्यांनी हा खटाटोप केला आहे. मी माझ्या पॅनलशी एकनिष्ठ आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.