जळगाव जिल्ह्यातील थकबाकीदारांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:30 PM2018-06-07T13:30:02+5:302018-06-07T13:30:02+5:30
जळगाव : गेल्या चार-पाच वर्षांपासून कर्जाची थकबाकी असलेल्या बचतगट व पगारदार नोकरांकडून वसुलीसाठी जिल्हा बँकेने कठोर भूमिका घेतली असून त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रथम कायदेशिर नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा बँकेत पगारदार नोकरांचे तसेच बचतगटांचे खाते आहेत. या खातेदारांनीही जिल्हा बँकेतून कर्ज घेतले आहे. त्यापैकी ६० पगारदार नोकरांचे सुमारे दीड कोटी रूपये थकीत आहेत. गेल्या ३-४ वर्षांपासून ही थकबाकी असून वारंवार वसुलीसाठी प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे फौजदारीचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा बँकेत खातेदार असलेल्या सुमारे १९६ बचतगटांकडे सुमारे ५ वर्षांपासून १ कोटी ९० लाखांची थकबाकी आहे. ती वसुलीसाठी देखील फौजदारीचा आधार घेतला जाणार आहे.