नऊ लाख रुपये चोरी प्रकरणात परप्रांतीय टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 07:23 PM2020-10-09T19:23:18+5:302020-10-09T19:24:05+5:30
बोदवड : मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलीस पथक पोहचले मध्यप्रदेशात
बोदवड : स्टेट बॅकेतून झालेल्या नऊ लाख रुपयांच्या चोरीप्रकरणात परप्रांतीय चोर असल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. तर लवकरच त्यांना गजाआड केले जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी व्यक्त केला आहे.
गत वर्षी स्टेट बँक मध्ये पेट्रोल पंपाचा भरणा करण्यासाठी आलेल्या ज्वालासिंग याच्या जवळची सत्तर हजारा ची रोकड तर यंदा १७ सप्टेंबर रोजी अमर डेअरीचा सुमारे नऊ लाख रुपयांचा स्टेट बँकच्या बोदवड शाखेत भरणा करण्यासाठी आलेल्या उमेश महाजन या कर्मचाऱ्या जवळचे सर्व पैसे घेऊन दोन तरुण पसार झाले होते.
या दोन्ही प्रकरणाच्या तपासाचे आव्हान बोदवड पोलीस पुढे असताना गेल्या वीस दिवसापासून याच्या मागोवा घेत बोदवड पोलिसांचे पथक पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशच्या सीमेत दाखल झाले असून यात त्यांनी चोरीच्या घटनेचे गूढ उकलण्यास सुरवात केली आहे. या चोरीच्या घटनेत परप्रांतीय टोळी असून लवकरच ते पकडले जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोर हे अट्टल असून सदर पथकाची माहिती कळताच त्यांनी ठिकाण बदलले आहे. पोलीस पथक हे मागावर असून लवकरच यश येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.