परप्रांतीय श्रमिकांनी आता घेतला रिक्षांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:20 PM2020-05-11T12:20:02+5:302020-05-11T12:28:10+5:30
परप्रांतीय श्रमिक आता मुंबईहुन रिक्षाने परतू लागले आहेत.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोरोना संसर्ग रोगाच्या भीतीने व लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेले श्रमिक मजुरांसह मुंबईतील रिक्षा चालकांनीही मुंबापुरी सोडणे सुरू केले आहे. पायी, दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहनांपाठोपाठ आता तीन चाकी आटो रिक्षानेही परप्रांतीय श्रमिकांचा प्रवास सुरू केला असून, झारखंड राज्यात जाणाऱ्या मुंबईतील अनेक रिक्षा सोमवारी मुक्ताईनगरपर्यंत पोहोचल्या होत्या.
एरव्ही मुंबई उपनगरात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या मुंबई पासिंगच्या अनेक रिक्षा सोमवारी सकाळपासून मुंबई नागपूर एशिया महामार्ग क्र. ४७ वर सुसाट धावताना दिसून आल्या, तर काही रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. या रिक्षांचा प्रवास मुंबई उपनगरातून थेट झारखंड राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तब्बल बाराशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा आहे.
मुंबई उपनगरात रिक्षाचालक म्हणून उदरनिर्वाह करणारे हे श्रमिक आपल्या कुटुंब व नातेवाईकांसह झारखंड जायला निघाले होते. अगदी वैद्यकीय तपासण्या आणि ट्रांझिक पास घेऊन एक रिक्षात दाटीवाटीने ५ ते ७ प्रवाशी प्रवास करीत होते.
रविवारी सायंकाळपासून बांद्रा, सायन, दादर आणि ठाणे उपनगरीय परिसरातून निघालेल्या या रिक्षा रात्रभर प्रवास करून सकाळी मुक्ताईनगरपर्यंत पोहोचल्या होत्या. थकलेले श्रमिक रस्त्याचा महामार्गाच्या कडेला ८१ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या व्हॉल्वमधील पाणी गळती पाहून प्रातर्विधी व अंघोळीसाठी थांबल्या होत्या. अन्न छत्र किंवा मिळेल तेथे जेवण आणि सावली तेथे थांबा आणि पाण्याची सोय तेथे अंघोळ अशी दिनचर्या घर गाठेपर्यंत या श्रमिकांची सोबत कुटुंबातील महिलाही असल्याने त्यांचा हा लांब पल्ल्याचा प्रवास काळजीचा होय.
"मुंबईत लॉक डाउन असल्यामुळे रिक्षा बंद आहेत. उदरनिर्वाह करण्यास पैशांची चणचण. महानगरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने कोरोना लागण होण्याचा धोका आहे. कुटुंबाची सुरक्षितता महत्वाची म्हणून रिक्षानेच कुटुंबासह झारखंड येथील आपल्या गावाकडे निघालो आहे."
-प्रदीप मंडल, गिरडिह (झारखंड)