वृक्षलागवडीसाठी वनविभागाच्या जनजागृती चित्ररथाचे जळगावात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:40 PM2018-04-01T12:40:06+5:302018-04-01T12:40:06+5:30
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १ - वृक्षलागवडीसाठी जनजागृती चित्ररथाचे जळगाव येथे आगमन होऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी या चित्ररथाचे स्वागत केले.
शासनाच्यावतीने राज्यात येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेबाबत राज्यातील नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वन विभागाच्यावतीने चांदा (चंद्रपूर) ते बांदा, सावंतवाडी (सिंधुदूर्ग) वृक्ष लागवड जनजागृती चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे आगमन जळगाव शहरात झाले. यानिमित्ताने येथील काव्यरत्नावली चौकात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी चित्ररथाचे स्वागत केले. जिल्ह्यात १३ कोटी वृक्ष लागवड, हरीतसेना, महाराष्ट्र वनसंवर्धन इत्यादीबाबत जनजागृती होण्यासाठी या चित्ररथास हिरवी झेंडी दाखविण्यात आल्यानंतर चित्ररथ मार्गस्थ झाला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्यासह आमदार सुरेश भोळे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जळगावचे उप वनसंरक्षक डी. डब्लू, पगार, यावलचे उप वनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, एस.आर. पाटील,, एन.ए. पाटील, एन.जी. पाटील, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक वाढई, सहायक वनसंरक्षक एस.एस. रनाळकर, हरितसेना मास्टर ट्रेनर प्रविण पाटील, राजेश जाधव यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, हरित सेनेचे विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.