बामणोदजवळील अपघातात पाल येथील वनरक्षक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 14:50 IST2020-06-14T14:49:59+5:302020-06-14T14:50:49+5:30
वनरक्षक दत्तात्रय जाधव हे पाल घरी परतत असताना बामणोद गावाजवळ भीषण अपघात होऊन त्यात ते जागीच ठार झाले.

बामणोदजवळील अपघातात पाल येथील वनरक्षक जागीच ठार
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : यावल वनविभागात कार्यरत असलेले वनरक्षक तथा सेवानिवृत्त सैनिक दत्तात्रय जाधव हे पाल ता.रावेर येथून भुसावळ येथे घरी परतत असताना त्यांचा बामणोद गावाजवळ भीषण अपघात होऊन त्यात ते जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली
वनरक्षक दत्तात्रय जाधव पाल येथे नेमणुकीस होते. पाल येथून रात्री मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-२७१६) ने भुसावळ येथे आपल्या घरी जात होते. तेव्हा बामणोद गावाजवळील पेट्रोल पंपाच्या पुढे भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (क्रमांक एमएच-१९-बीजे-५०१३) ने जाधव यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की जाधव जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वनरक्षक जाधव यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला तर अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
या अपघातप्रकरणी किशोर जाधव यांनी फिर्याद दिली. त्यावरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि राहुल वाघ फौजदार रोहिदास ठोंबरे करीत आहे.
वनरक्षक दत्तात्रय जाधव हे जामनेर मूळ रहिवासी असून ते भुसावळ येथे वास्तव्यास होते. ते भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस दीपक जाधव यांचे भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.