भूतकाळ विसरा, स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:16 AM2021-04-11T04:16:23+5:302021-04-11T04:16:23+5:30
जळगाव : कोरोना होऊन गेल्यानंतर आपल्या मनात अनेक विचार येतात. परंतु आपण या आजारातून बाहेर पडलो असून, पुन्हा आजार ...
जळगाव : कोरोना होऊन गेल्यानंतर आपल्या मनात अनेक विचार येतात. परंतु आपण या आजारातून बाहेर पडलो असून, पुन्हा आजार होणार नाही अशी सकारात्मकता बाळगा. भूतकाळ विसरून स्वतःच्या अंतर्मनाची शक्ती अधिक बलवान करा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सतीष पाटील यांनी दिला.
जळगाव आयएमएतर्फे जिल्हावासीयांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते कोरोना पश्चात स्वास्थ आणि मनशांती या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेत आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी आणि सचिव डॉ. राधेश्याम चौधरी हेदेखील सहभागी झाले होते.
मुख्य वक्ते डॉ. सतीष पाटील यांनी दुसरे पुष्प गुंफताना सांगितले की, कोरोना पश्चात अनेक व्यक्तींच्या स्वभावात, वागण्यात आणि बोलण्यात बदल होतो. अनेक रुग्ण कोरोनावर मात करतात. परंतु त्यानंतर त्यांची मानसिक हिंमत खचते. रुग्णांनी स्वतःची अंतर्मनाची शक्ती वाढवली पाहिजे. स्वतःच्याच मनाशी सकारात्मक गोष्टी बोलल्या पाहिजे. हवेतल्या गोष्टींपेक्षा, अवास्तव भीतीपेक्षा वास्तवाशी संपर्क ठेवला पाहिजे. सकाळी लवकर उठण्यासाठी प्रयत्न करा. रात्री झोपेची गोळी घेणे टाळा, पाणी, झोप, विश्रांती पुरेसे घ्या. नियमित व्यायाम करा, असे त्यांनी सांगितले.
लहान-लहान छंद जोपासा, मन वळवा कोरोना आजार होऊन गेल्यानंतर त्याचे रिपोर्ट, औषधी यांचे विचारमंथन, चर्चा करत बसू नये. नातेवाइकांनीदेखील रुग्णांना धीर द्या. मनातील संतापाला वाट देण्यासाठी अंक १००पासून उलट मोजा, दोन्ही हाताची बोटे एकमेकांत घट्ट अडकवून ओढा, नादुरुस्त मोबाइल, बंद रिमोट सोबत ठेवा, त्याची बटणे दाबा, जुन्या पोस्टरवर शाई शिंपडून स्वतःचा संताप काढा. डॉक्टरांनी रुग्णांना औषधोपचारसह मानसिक आधार द्या त्यांचे समुपदेशन करा, असे आवाहन डॉ. सतीष पाटील यांनी केले.