अयोध्या नगरात भुंकणाऱ्या कुत्र्याला ठार मारुन माजी नगरसेवकाकडे घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:24 PM2019-04-16T13:24:24+5:302019-04-16T13:24:54+5:30
निवडणुकीचा पैसा समजून प्रचार साहित्याचे खोके फोडले
जळगाव : निवडणुकीसाठी पैसा आल्याचे समजून चोरट्यांनी खोके फोडले, मात्र त्यात प्रचारसाहित्य निघाल्याने निराश झालेल्या चोरट्यांनी भाजपचे माजी नगरसेवक तथा मंडळ अध्यक्ष प्रदीप रामकृष्ण रोटे यांच्या घरातील कपाट फोडून पाच हजार रुपये लांबविले. तत्पूर्वी गल्लीत भूंकणाºया कुत्र्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने कुत्र्यालाच ठार मारले. सोमवारी पहाटे पहाटे अयोध्या नगरात ही घटना उघड झाली.
भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रोटे हे पत्नी व दोन मुलांसह आयोध्यानगरातील श्रीरामपार्क जवळ वास्तव्यास आहेत. मुलगा व मुलगी दोन्ही पुण्याला शिकायला असून घरी पती व पत्नी असे दोघे राहतात. महिनाभरापासून पुण्याहून मुलगी घरी आली आहे. दुमजली घर असून खालच्या घरात कपाट, साहित्य ठेवले आहे. साहित्य ठेवण्यासह जेवणासाठी या खोलीचा वापर होतो.
कुटुंब वरच्या खोलीत अन् खालच्या घरात चोरी
रविवारी रात्री वादळ असल्याने लाईट बंद होती. ११ वाजेपर्यंत सर्व जण जागी होते. यानंतर खालच्या खोलीला कुलूप लावून रोटे कुटुंब वरच्या मजल्यावर झोपले. सकाळी उठल्यावर रोटे यांच्या पत्नी साधना या खाली आल्यावर त्यांना दरवाजाचे कुलुप तुटलेले दिसले. यानंतर घरात पाहणी केल्यावर चोरीचा प्रकार उघड झाला.
सुदैवाने मित्रांचे सव्वा लाख रुपये वाचले
प्रदीप रोटे हे मूळचे नशिराबाद येथील रहिवासी आहेत. २५ वषार्पासून ते अयोध्यानगरात वास्तव्यास आहेत. नशिराबाद येथे शेती तर जळगावात पक्षाचे काम करतात. नशिराबाद येथील जवळच्या मित्राने रोटे यांना सव्वा लाख रुपयांची रक्कम ठेवण्यासाठी दिली होती. रोटे यांनी ती घरी कपाटात सुरक्षीत ठेवली होती. रविवारी सकाळीच त्यांनी मित्राला ती रक्कम परत केली. ही परत केली नसती तर चोरी होवून मोठे नुकसान झाले असते.
दोन दिवसांपासून दुचाकीवरुन रेकी
रोटे यांच्या शेजारचे तिवारी तसेच वाणी यांच्या माहितीनुसार एक जण दुचाकीवरुन रोज ये-जा करत होता. रोटे मंडळ अध्यक्ष असल्याने त्यांच्या घरी १३ रोजी निवडणुकीच्या प्रचारार्थ मोदींचे मास्क व टी-शर्ट असे साहित्य आले. रेकी करणाºयाला निवडणुकीत वाटपासाठी पैसा आल्याचे वाटले. मोठी रक्कम हाती लागेल म्हणून चोरट्यांनी रविवारी रात्री रोटेंच्या घराचे कुलुप तोडले. खोके तपासले असता त्यात निवडणुकीचे साहित्य दिसले. ते तसेच सोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून ५ हजार रुपये लांबविले. देवघरातील चांदीचा ग्लास देव सुरक्षित आहे.
कुत्र्यांचा जीव घेवून नंतर चोरी
दरम्यान, गल्लीत आल्यानंतर चोरट्यांना पाहून कुत्रा भुंकायला लागला. घरात घुसण्यापूर्वी चोरट्यांनी त्याला ठार मारले. त्यानंतर घरात घुसून रक्कम लांबविली. सकाळी उठल्यावर उभ्या चारचाकीवर रक्ताचे डाग दिसल्याने कुत्र्याला मारल्याचा प्रकार समोर आला. यानंतर रोटे यांच्या घरी आलेल्या नगरसेवकांनी महापालिकेचे गाडी बोलावून मेलेल्या कुत्र्याची विल्हेवाट लावली.