जळगावात कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे, माजी महानगर महिला अध्यक्षा अरूणा पाटील निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:47 PM2019-04-05T12:47:33+5:302019-04-05T12:48:21+5:30
दुकानांच्या वादाचे पडसाद
जळगाव : कॉँग्रेस भवनाच्या आवारातील मोकळ्या जागेतील दुकानांच्या वादावरून सुरू असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे व माजी महानगर महिला अध्यक्षा अरूणा पाटील यांना कॉँग्रेस पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कॉँग्रेस भवनातील दुकानांचा वाद गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. तब्बल ४० वर्षांपासून अत्यल्प भाड्यावर कॉँग्रेस भवनात कापडे विक्रेत्यांना जागा देण्यात आली आहे. तत्कालीन अध्यक्ष अख्तरअली काझी यांच्या काळात या दुकानांना जागा देण्यात आली आहे. मात्र मनपा अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईनंतर दुकानांना दिलेल्या जागेचा वाद पेटला आहे.
जागा भाड्याने नको
ही जागा भाड्याने नकोे म्हणून अरूणा पाटील व अन्य काही कार्यकर्त्यांचा विरोध होता. यासाठी त्यांनी भिकमांगो आंदोलनही केले. या आंदोलनामुळे पक्षाची बेअब्रु झाली असा ठपका जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी ठेवला होता त्यानंतर अरूणा पाटील यांची महिला महानगर अध्यक्षपदावरून गच्छंती झाली होती.
सरचिटणीस पाटील यांना काळे फासले
पक्षाने केलेल्या कारवाईनंतर शांत न बसता अरूणा पाटील व त्यांच्या समर्थकांनी गेल्याच आठवड्यात कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांना मारहाण करत त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर संजय वराडे यांच्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गेल्याच आठवड्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. तीन दिवस ते जिल्हा कारागृहात होते.
पक्षाकडून गंभीर दखल
संजय वराडे यांचे तालुका अध्यक्षपद यापूर्वीच काढण्यात आले होते. अशीच कारवाई अरूणा पाटील यांच्यावर होऊनही त्यांनी मारहाण व सरचिटणीस अजबराव पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार केल्याने या दोघांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र कॉँग्रेस जिल्हाध्यक्षांना नुकतेच प्राप्त झाले. ऐन निवडणुकीत दोघा माजी पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटना, दाखल गुन्हे व पक्षशिस्तीला बाधा आणण्याचा प्रकार केव्हाही खपवून घेतला जाणार नाही. दादागिरी, गुंडगिरीमुळे पक्षात येणाऱ्यांरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गंभीर दखल पक्षाने घेऊन दोघांवर कारवाई केली आहे.
- अॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस.