माजी महापौर रमेशदादा जैन यांच्या कार्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 09:16 PM2020-10-09T21:16:28+5:302020-10-09T21:16:52+5:30

महत्वाची कागदपत्रे जळून खाक : तब्बल दीड ते दोन तास आग ; दोन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण

Former mayor Rameshdada Jain's office on fire | माजी महापौर रमेशदादा जैन यांच्या कार्यालयाला आग

माजी महापौर रमेशदादा जैन यांच्या कार्यालयाला आग

Next

जळगाव : उद्योजक, माजी महापौर आणि खान्देश विकास आघाडीचे नेते रमेशदादा जैन यांच्या खान्देश मिल कॉम्पलेक्स येथील कार्यालयाला आग लागून महत्वाची कागदपत्रे तसेच संगणक व ए.सी जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याचे रमेशदादा जैन यांनी 'लोकमत'ला सांगितले. तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरातील खान्देश मिल कॉम्पलेक्समध्ये माजी महापौर रमेशदादा जैन यांचे कार्यालय आहे. दररोज शिपाई समाधान (पूर्ण नाव माहिती नाही) हा कार्यालय उघड व बंद करीत असतो. त्याप्रमाणे विजेचे मुख्य स्विचही बंद व सुरू करतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास शिपायाने कार्यालय उघडले. विद्युत पुरवठा सुरू करण्‍यासाठी मुख्य स्विच सुरू केले. तेव्हा कार्यालयामधील संगणक कक्षात मोठा आवाज झाला. हे बघण्‍यासाठी शिपाई संगणक कक्षामध्‍ये गेला, तेव्हा त्यास आग लागल्याचे दिसून आले. लागलीच शिपायाने स्विच बंद केला.

आणि...बघितले तर काय...आगीने धारण केले रौद्ररूप
शिपाई समाधान हा मुख्य स्विच बंद करून पुन्हा संगणक कक्षाकडे आले असता, तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. पाहता-पाहता काही क्षणातचं आगीने रौद्ररूप केले आणि आगीचे मोठ-मोठे लोळ दुरपर्यंत पसरले. शिपायाने लागलीच कार्यालयातील कर्मचा-यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नंतर रमेशदादा यांना देखील आगीची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला संपर्क साधला.

मोटारसायकल स्वाराने घेतली अग्निशमन दलाकडे धाव
कार्यालयातील फर्निचर व कागदपत्रांमुळे आगीचा भडका उडाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. पाहता-पाहता आगीच्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यातच एका दुचाकीस्वाराने मनपाच्या अग्निशमन दलाकडे धाव धाव घेवून आगीची माहिती दिली. तो पर्यंत काही नागरिकांचा आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.

दीड ते दोन तासानंतर आगीवर नियंत्रण
माजी महापौरांच्या कार्यालयाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने खान्देश मिल कॉम्पलेक्स काही क्षणातच गाठले. दोन बंबांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करण्‍यात आला. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी अपयश येत होते. अखेर दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्‍यात मनपाच्या अग्निशमन दलाला यश आले. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे युसूफ पटेल, अश्वजित घरडे, गंगाधर कोळी, राजमल पाटील, सोपान जाधव, देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, गिरीष खडके, तेजस जोशी, प्रदीप धनगर, संतोष पाटील, गोकुळ गालफाडे, मदन जराड, नामदेव पोळ, बाळू पोळ यांनी प्रयत्न केले.

महत्वाची कागदपत्रे, संगणक, फर्निचर जळून खाक
एक ते दीड तास चाललेल्या आगीत कार्यालयातील सर्वात महत्वाचे जळून खाक झाले. त्याचबरोबर संगणक, ए.सी तसेच फर्निचर असेही जळून खाक होवून सुमारे लाखो रूपयांचे नुकसान आगीत झाले. अजून किती लाखांचे नुकसान झाले हे समोर आलेले नाही. दरम्यान, आगीत जी सर्वात महत्वाची कागदपत्रे होती, ती सर्व जळाली असल्याचे रमेशदादा जैन यांनी 'लोकमत'ला सांगितले.

Web Title: Former mayor Rameshdada Jain's office on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.