माजी मंत्री गिरीश महाजन कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:26+5:302021-03-17T04:16:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील सत्ताधारी भाजपची सत्ता संकटात असतानाच आता भाजपचे संकटमोचकच संकटात सापडले आहेत. मंगळवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील सत्ताधारी भाजपची सत्ता संकटात असतानाच आता भाजपचे संकटमोचकच संकटात सापडले आहेत. मंगळवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कोरोनाची तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून गिरीश महाजन यांना ताप होता. सोमवारी ते मुंबईला रवाना झाले होते, तर मंगळवारी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती भाजपच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठी फूट पडली आहे. भाजपचे २५ हून अधिक नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले असताना, भाजपसमोर महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे. अशा परिस्थितीत गिरीश महाजन हेच भाजपला या संकटातून बाहेर काढू शकतात. मात्र, गिरीश महाजनच आता कोरोना बाधित झाल्याने भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. रविवारी रात्री गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळावर नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान देखील महाजन तापाने फणफणले होते, अशी माहिती या बैठकीत उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी ‘लोकमत’ला दिली. अखेर गिरीश महाजन यांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून
महाजन यांचा तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी रुग्णालयातूनच गिरीश महाजन सध्याच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच काही नगरसेवकांशीदेखील ते संपर्कात असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्र जमा करण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी दिल्या असल्याची माहिती भाजपच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे. सोमवारी सायंकाळी भाजपचे काही पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात काही कागदपत्रांचा तपासणीबाबत दाखल झाले होते. काही फुटलेल्या नगरसेवकांबाबतही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.