राज्याचे माजी मंत्री व त्यांचे कुटुंबीय निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 11:59 AM2020-06-03T11:59:39+5:302020-06-03T11:59:58+5:30
जळगाव : कोरोना बाधित जिल्हा परिषद सभापतींच्या संपर्कात आलेले राज्याच्या माजी मंत्र्यासह त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील ११ जणांची कोरोना ...
जळगाव : कोरोना बाधित जिल्हा परिषद सभापतींच्या संपर्कात आलेले राज्याच्या माजी मंत्र्यासह त्यांच्या कुटुंबातील व संपर्कातील ११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहे. कुटुंबीय व इतर होमक्वारंटाईन आहे.
यात या माजी मंत्री व त्यांच्या पत्नीचे अहवाल सकाळीची निगेटीव्ह आले होते़ त्यानंतर उर्वरित ९ जणांचे अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाले़ जिल्हा परिषदेचे ३६ वर्षीय सभापती यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांचे व त्यांच्या मुलाचे स्वॅब घेण्यात आले होत़ यात सभापतींसह त्यांचा ११ वर्षाच्या मुलाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला़ यामुळे खळबळ उडाली़ दरम्यान, या सभापतींचे राज्याच्या माजी मंत्र्यांकडे येणे-जाणे असल्याने त्यांचेही नमुने सोमवारी रात्रीच घेण्यात आले होते़ त्यांची तत्काळ तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यात हे माजी मंत्री व त्यांच्या पत्नीचे अहवाल मंगळवारी सकाळी निगेटिव्ह आले व इतरांचे संध्याकाळी अहवाल आले. सुदैवाने तेदेखील निगेटिव्ह आहे. जिल्हा परिषद सभापतींच्या संपर्कात माजी मंत्री आल्याची चर्चा सोमवारी रात्रीच सुरू झाली होती.
शहरात पुन्हा २१ नवे रुग्ण
शहरात मंगळवारी सायंकाळी दोन व रात्री उशिरा १९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत़ यातील वाल्मिकनगरातील १० बाधितांचा समावेश आहे़ पहिल्या टप्प्यात जयकिसनवाडी व गणेशपुरी भागात दोन बाधित आढळून आले होते़ यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालांमध्ये वाल्मिकनरातील दहा, निमखेडी शिवार १, नवल कॉलनी ३, भिमनगर १, हुडको १, मास्टर कॉलनी १ यांच्यासह अन्य दोघांच्या पत्त्त्यांबाबत स्पष्टीकरण नव्हते़ शहरात अंत्ययात्रेतून पुन्हा संसर्ग वाढल्याचे सांगण्यात येत आहे़