माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बहिणीचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 06:59 PM2019-05-12T18:59:13+5:302019-05-12T18:59:27+5:30
पाळधी जवळील दुर्घटना :मोटरसायकलस्वारही ठार
पाळधी, ता.धरणगाव : जळगावकडून एरंडोलकडे जाणाऱ्या चारचाकीचे मागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते (वय ६५) यांचा मृत्यू झाला. गाडीचे टायर फुटल्याने समोरून येणाºया मोटारसायकलस्वारास जबर धडक बसली. यामुळे मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.
स्नेहजा रुपवते या विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कन्या होत. त्या खिरोदा येथे भाचीचे लग्न आटोपून नातेवाईकांसोबत मुंबईकडे घरी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. १२ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव पासून जवळच पाळधी बायपासवतर एमएसईबी कार्यालयाजवळ हा अपघात झाला.
जळगावकडून एरंडोलकडे जाणारी चारचाकी (एम.एच.४६ पी.९०५८) ही वळण रस्त्यावर आली असता या गाडीचे मागील दोन्ही टायर फुटल्याने गाडी चालकाचे नियंत्रण सुटले व महामार्गावर पाच ते सहा पलट्या घेतल्याने त्यातील सात जण जखमी झाले. या दरम्यान एरंडोलकडून जळगावकडे जाणाºया मोटारसायकलला (एम.एच.१९ बी.डब्लू.६८४५) जबर धडक दिली. मोटारसायकलस्वार हा रस्त्याच्याकडेला फेकला जाऊन जागीच ठार झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, दोन्ही गाड्या सुमारे ५० ते ६० फुटापर्यंत फेकल्या गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघात झाला तेव्हा एरंडोल येथील कृष्णा हॉटेलचे मालक कृष्णा पिंताबर ठाकरे हे आपल्या वाहनाने जळगावकडे जात होते. त्यांनी आपल्या गाडीतील लोकांना तेथेच उतरवून जखमींना जळगावला पुढील उपचारासाठी नेले. तर याचवेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या रूग्णवाहिकेतून बाकी जखमींना जळगाव येथे हलविण्यत आले.
अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, अपघातामुळे वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली होती. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांनी यश मिळाले.