बेपत्ता झालेल्या माजी आमदारपुत्र तीन दिवसानंतर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:34 PM2019-04-09T12:34:05+5:302019-04-09T12:34:46+5:30
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत अमोल पाटील बेपत्ता झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.
जळगाव : कौटुंबिक वादातून घरातून बेपत्ता झालेले शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील तीन दिवसानंतर सोमवारी सायंकाळी घरी परतले. जळगावात आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्यात ते हजर झाले. तेथे जबाब दिल्यानंतर ते घरी परत गेले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत अमोल पाटील बेपत्ता झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल चिमणराव पाटील (४२, रा.पारोळा,सुमन हाईटस्, ह.मु.विक्रीकर कार्यालयासमोर, जळगाव) हे ६ रोजी सकाळी १० वाजता घरात कोणालाच काहीही न सांगता स्वत:च्या चारचाकीसह (क्र.एम.एच.१९ सी.यु.०५५५) घरातून निघाले. बाहेर जातांना त्यांनी मोबाईल घरीच ठेवला होता. त्या मोबाईलवर दुपारी एटीएममधून पैसे काढल्याचा संदेश प्राप्त झाला.
पती अमोल हे घरातून निघून गेल्याची माहिती पत्नी मृणाल यांनी अमोल यांचे आतेभाऊ अतुल प्रभाकर कदम (रा.रायसोनी नगर, जळगाव) यांना दिली. त्यांनी पारोळा व इतर नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र रात्री उशिरापर्यंत शोध न लागल्याने अतुल कदम यांनी रात्री बारा वाजता रामानंद नगर पोलिसात अमोल हरविल्याची तक्रार दिली. त्यानुसार हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतरही ठाणे अंमलदार अरुण पाटील यांनी ही माहिती पत्रकारांना दिली नव्हती.
पत्नीशी वाद झाल्याची चर्चा
पत्नी मृणाल यांच्याशी अमोल यांचा वाद झाला होता व त्यातूनच त्यांनी घर सोडल्याचे सांगितले जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी चौकशी केली असता अमोल हे शेगाव येथे असल्याचे निष्पन्न झाले. अतुल हे स्वत: अमोल यांना घेण्यासाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी ते परत आले. व्यवसायाच्या ताणतणावातून आपण विश्रांतीसाठी शेगाव येथे गेलो होतो असा जबाब अमोल यांनी दिल्याची माहिती सहायक निरीक्षक बेंद्रे यांनी ‘लोकमत’ ला दिली.
अमोल घर सोडून जाण्याला राजकीय व इतर असे महत्वाचे कोणतेच कारण नव्हते. शेगाव येथे दर्शनासाठी गेला होता. तो आता घरी परत आला आहे.
-चिमणराव पाटील, माजी आमदार