टाकाऊ वस्तूंपासून बनविला किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 09:03 PM2020-11-21T21:03:12+5:302020-11-21T21:03:21+5:30
मुलांनी केली सुंदर कलाकृती
स वदा ,ता.रावेर : दिवाळी आली म्हणजे सर्वांच्या आनंदाला उधाण येते. चिमुकल्या जीवांना फराळाची, तरुणांना फटाक्यांची व नवीन कपडे घालून मिरवण्याची आवाड असते. तर गृहिणींना फराळ तयार करून सर्वांना खाऊ घालण्याची लगबग असते. लेकीला माहेरची ओढ असते. अशा या दिवाळीत कलावंतांना सुद्धा काहीतरी नवीन करावसं वाटतं. त्याचप्रमाणे ईशान आणि वरद या दोघा मुलांनी दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बनविण्याचं ठरवल आणि सुंदर कलाकृतीही घडविली.सुरुवातीस मित्रमंडळीच्या बैठकीत किल्ला बनविण्यावर शिक्कामोर्तब झाले. नंदू सरांनी मातीच्या किल्ल्यापेक्षा वेस्टेज वस्तू वापरण्याचा सल्ला दिला. यात कापड, वर्तमानपत्र, बांबू,स्पंज रंगवून डोंगर टेकड्या व पुठ्ठ्याचे बुरुज तसेच दरवाजे केले. तुरखाटीच्या काड्या वापरून जुन्या साडीच्या चिंध्या तसेच वर्तमानपत्र वापरून त्यावर कापडी झेंडे लावून किल्ला तयार झाला. या किल्ल्याच्या अग्रभागी शिवछत्रपती शिवाजी राजे यांची मूर्ती ठेवून शिवाजी महाराज की जय असा जयघोष सुरू झाला. किल्ल्याच्या विविध भागांची चर्चा सुरू झाली. हा बुरुज... हा दरवाजा... हा कडा ...हा महल तसेच भंडारा घर, विहीर, तोफखाना असे शब्द कानावर आले. इतिहास मुलांच्या मनात रहावा हा उद्देश सफल झाला. किल्ला लोकांपर्यंत पोहोचला लोक पाहायला येऊ लागले त्यांच्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.