चाळीसगावला अ.भा. मराठी विज्ञान परिषदेचे ५३ वे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 04:45 PM2018-12-18T16:45:28+5:302018-12-18T17:22:35+5:30
अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उद्घाटन होणार आहे.
चाळीसगाव : अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उद्घाटन होणार आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी उमविचे माजी कुलगुरु व गणितज्ञ प्रा. एन.के.ठाकरे तर स्वागताध्यक्ष आमदार उन्मेष पाटील असतील. तीन दिवसीय संमेलनात विविध परिसंवादांसह, व्याख्यान, विज्ञान सहल, वैज्ञानिक गप्पा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनात शास्त्रज्ञ, अभ्यासक उपस्थित राहणार आहे. खान्देशात असे अ.भा.स्तरावरील अधिवेशन पहिल्यांदाच होत असल्याने मोठी उत्सुकता आहे.
२२ रोजी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात अधिवेशनाच्या उद्घाटन होईल. मंदिर परिसरात यावेळी विज्ञान गीत, मान्यवरांचा परिचय, स्मरणिका प्रकाशन, पुरस्कार वितरण होईल. प्रा. एन.के.ठाकरे अध्यक्षीय भाषण करतील. दुपारच्या सत्रात य.ना.चव्हाण महाविद्यालयात तीन वाजता कापसावरील बोंडअळीचे निर्मूलन या विषयावर नागपुर येथील कॉटन रिसर्चचे प्रभारी संचालक डॉ. व्ही.एन.वाघमारे यांचे व्याख्यान होईल. दुपारी चार वाजता 'महिलांचे आरोग्य' याविषयावरील परिसंवादात डॉ. राजेंद्र आगरकर, डॉ. विनोद कोतकर, डॉ. सुनील राजपुत, डॉ.नियती चितालीया आदी सहभागी होतील. सायंकाळी वातार्लाप आणि रात्री मनोरंजन सोहळा होईल. उपस्थितीचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे चाळीसगाव विभागाचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, कार्यवाह डी.टी.पाटील, उपाध्यक्ष प्रा.अ.वा.बागड, कोषाध्यक्ष सी.सी.वाणी, प्रा. ल.वि.पाठक, सुधीर पाटील, डॉ. विनोद कोतकर यांनी केले.
डॉ. अनिल काकोडकर मारणार विद्यार्थ्यांशी वैज्ञानिक गप्पा
अधिवेशनाच्या दुस-या दिवशी २२ रोजी सकाळी नऊ वाजता 'गणित व विज्ञान शिक्षणाच्या नवीन वाटा' या विषयावरील परिसंवादात प्रा.एन.के.ठाकरे, डॉ. विवेक पाटणकर, प्रा. भालचंद्र भणगे, प्रा. श्रीगणेश प्रभू, प्रा. रंजन गर्गे आदी वक्ते मार्गदर्शन करतील. दुपारी 'सर्वांसाठी शाश्वत सौर उर्जा' यावर अभय यावलकर, 'सिलेज' या विषयावर डॉ. अनिल काकोडकर यांचे व्याख्यान होईल.
दुपारी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे वैज्ञानिक गप्पा मारतील. या गप्पांमध्ये प्रा. ज्येष्ठराज जोशी, प्रा. एन.के.ठाकरे हेही सहाभागी होतील.
देशभरातील अभ्यासक सहभागी होणार
मराठी विज्ञान परिषदेच्या ५३व्या अधिवेशनात देशभरातील ३०० हून अधिक विज्ञान अभ्यासक सहभागी होणार असून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागण्यासह विज्ञान प्रसारासाठी हे अधिवेशन प्रथमच खान्देशात होत आहे. २०० हून विद्यार्थी देखील सहभागी होतील. अशी माहिती प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.
वैज्ञानिक सहलीने सांगता
अधिवेशनाची सांगता २४ रोजी वैज्ञानिक सहलीने होणार आहे. सहलीत केकी मुस कलादालन, वेरुळ येथे भेटी दिल्या जातील.