एटीएमचा कोड मिळवून गंडा घालणा-या दिल्लीच्या चार ठगांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:25 PM2019-04-13T22:25:23+5:302019-04-13T22:28:19+5:30
बँकेतून मॅनेजर बोलतोय, तांत्रिक कारणामुळे तुम्हाला एटीएम कार्ड बदल करावे लागणार आहे असे सांगून ग्राहकांकडून एटीएमचा कोड व १६ अंकी क्रमांक मिळवून आॅनलाईन गंडा घालणा-या दिल्लीच्या टोळीचा जळगाव सायबर ठाण्याच्या पोलिसांनी पदार्फाश केला असून चार जणांना अटक केली आहे.
जळगाव: बँकेतून मॅनेजर बोलतोय, तांत्रिक कारणामुळे तुम्हाला एटीएम कार्ड बदल करावे लागणार आहे असे सांगून ग्राहकांकडून एटीएमचा कोड व १६ अंकी क्रमांक मिळवून आॅनलाईन गंडा घालणा-या दिल्लीच्या टोळीचा जळगाव सायबर ठाण्याच्या पोलिसांनी पदार्फाश केला असून चार जणांना अटक केली आहे.
भुपेंदरकुमार मुकेशकुमार (२०), अमन बालकिशन लांबा (२१), राहूल कौशिक सुरेशकुमार (२१) व नितीन राकेश टंडन (२४) सर्व रा. नवी दिल्ली असे अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून दहा मोबाईल व लॅपटॉप, आयपॉड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान अटकेतील चारही जणांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता २० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भाड्याच्या घरातून चालायचा उद्योग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकडीने दिल्ली येथे एका भाड्याने फ्लॅट घेऊन तेथे कॉल सेंटरव्दारे अनेकांचे खाते क्रमांक, एटीएमचा पासवर्ड, पिन मिळवून त्या माध्यमातून आॅनलाईन गंडविण्याचा धंदा सुरु होता. फसवणूक करुन संबंधितांच्या खात्यातून आॅनलाईन शॉपिंग करुन महागड्या वस्तू खरेदी करायच्या व त्या कमी किमतीत विक्री केल्या जावून चौघे पैसे मिळवित असल्याची माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचायार्ला गंडा
जळगाव शहरारातील रहिवासी डॉ. अजय ओंकारनाथ दाहाड हे चांदवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य आहेत. त्यांच्या मोबाईलवर फोन करुन मी एस.बी.आय.क्रेडीट कार्ड हेडच्या कार्यालयातून बोलत असून तुमचे अगोदर एसबीआय बॅकेचे प्राईम कार्ड असल्याने त्या कार्डसाठीची वार्षिक शुल्क ३५३९ रुपये तुमच्या खात्यातून वजा करण्यात आली असून ती तुम्हाला परत करावयाची असे भासवून क्रेडीड कार्ड वरील सोळा अंकी व ओटीपी मिळवून १ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला होता. याप्रकरणी २८ मार्च रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल होता.
असा लागला संशयितांचा छडा
डॉ. दाहाड यांच्या फोनवर आलेला क्रमांक तसेच दाहाड यांच्या खात्यातून ज्या वस्तूंची आॅनलाईन खरेदी करण्यात आली होती. त्या दुकानदाराच्या खात्याची सायबर पोलिसांनी माहिती मिळविली. त्यानुसार संशयित दिल्ली येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम याना दिल्ली येथे तपासकामी पथक पाठविण्याचे आदेश दिले होते. उपनिरीक्षक अंगत नेमाणे यांच्या नेतृत्वाखाली पथक दिल्लीला गेले होते. दोन दिवस ठाण मांडल्यानंतर पक्की माहिती मिळाल्यावर पथकाने सापळा रचून सुरुवातीला म्होरक्या भुपेंदर सिंग कुमार व अमन लांबा या दोघांना अटक केली. त्यानंतर राहूल कुमार व नितीन टंडन यांच्या मुसक्या आवळल्या.
मास्टरमाईंडची लिव्ह इन रिलेशनमध्ये राहून फसवणूक
अटकेतील चौघे पदवीची द्वितीय तसेच तृतीय वषार्ला शिकत होते. मात्र पैसे कमविण्याचा सोपा मार्ग सापडल्याने सर्वांनी शिक्षण सोडले. भूपेंदर हा गुन्ह्यातील मास्टर माईंड आहे. तो यापूर्वी एका कॉलसेंटरमध्ये कामाला होता. उत्कृष्ट संभाषणाच्या कौशल्याने पोलीसही अवाक झाले आहेत. तो त्याच्या प्रेयसीसोबत भाड्याच्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. प्रेयसीमुळे त्याची अमनसोबत मैत्री झाली त्यानंतर दोघांनी दुसरा फ्लॅट घेवून हा उद्योग सुरु केला.