ट्रक पळवून कापूस चोरणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:52 PM2019-11-30T22:52:19+5:302019-11-30T22:52:25+5:30
चाळीसगाव पोलीसांची कारवाई : गुन्ह्यातील वाहने जप्त, सातजणांचा समावेश, आणखी तीन आरोपींचा शोध सुरु
चाळीसगाव : कोदगाव चौफुली जवळ आठ महिन्यांपूर्वी गुजरातकडे जाणारा कपाशीचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलसारख्या हत्याराचा धाक दाखवून चोरुन नेला व तेथून ते पसार झाले होते. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात दरोडा व चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती चार जणांना पोलीसांनी शुक्रवारी रात्री अटक केली व उर्वरीत तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दहा लाख रुपये किमतीच्या दोन्ही कार जप्त केल्या आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी दिली. यावेळी पोलीस उपअधिक्षक कैलास गावडे, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे उपस्थित होते. ही कारवाई पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
औरंगाबाद येथून भुज (गुजरात) येथे १५ टन कापसाचा ट्रक घेऊन जात असताना चाळीसगाव येथील कोदगाव चौफुली जवळील गतीरोधकाजवळ अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील सात चोरट्यांनी त्यांच्या जवळील पांढºया रंगाची कार ट्रकला आडवी लावली व पिस्तुलासारखे हत्यार रोखून त्यांनी ट्रकचा ताबा घेतला. त्यानंतर चोरट्यांनी ट्रकचालक भगवान दगडूबा गव्हाड (वय ३४, रा.चिकलठाणा, औरंगाबाद) यांना कारमध्ये बसवून रात्रभर फिरवून सकाळी साडे आठ वाजता धुळे-मालेगाव महामार्गावर निर्मनुष्य ठिकाणी सोडून दिले व हे चोरटे तेथून पसार झाले होते. चोरट्यांनी ट्रकचालकाच्या खिशातून २० हजार रुपयांची रोकड व ट्रकमधील आठ लाख ८७ हजार रुपये किमतीचा १४ टन कापूस चोरुन नेला. ही घटना १८ मार्च रोजी घडली होती. त्यानुसार ट्रकचालक भगवान गव्हाड यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसात त्या चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महावीर जाधव, पो.हे.कॉ.बापूराव भोसले, नितीन पाटील, तुकाराम चव्हाण, गोपाल बेलदार, राहुल गुंजाळ यांनी परिसरातील पिलखोड, दहिवाळ, कळवाडी, देवघट, चिंचगव्हाण, झोडगे, आर्वी या ठिकाणी अनेकांची विचारपूस केली. त्यावरुन पप्पू दशपुते (रा.चिंचगव्हाण, ता.मालेगाव) व कृषी केंद्रचालक गोकूळ पवार (रा.दहिवाळ, ता.मालेगाव) यांनी त्यांच्या साथीदारांसह सदर गुन्हा केला असावा, अशी माहिती दिली. पोलीस पथकाने चिंचगव्हाण व भिलकोट येथे जाऊन पप्पू उर्फ प्रशांत गोटीराम दशपुते (वय ४५) व गोकुळ संतोष पवार (वय ३४) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी घडलेली घटना कथन केली. पप्पू उर्फ प्रशांत गोटीराम दसपुते, गोकुळ संतोष पवार, हारुण ईब्राहीम शेख व दीपक सोनू बावा या चौघांना पथकाने अटक केली आहे. तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तपास अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभिमन पाटील, विजय शिंदे विनोद भोई, प्रविण सपकाळे, संदिप पाटील, दिपक पाटील, विनोद खैरनार, विजय पाटील, सतीष राजपूत हे तपास करीत आहेत.
चोरलेल्या कापसाची गुजरातेत विक्री
याप्रकरणी हारुन ईब्राहीम शेख (वय ५०, रा. चिंचगव्हाण, ता.मालेगाव), दीप सोनू बावा (वय ४२, रा. दहिवाळ, ता.मालेगाव), प्रकाश रमेश पवार (रा.कामठवाडा, नाशिक), तन्वीर शेख हारुन शेख (रा.चिंचगव्हाण, ता.मालेगाव), काळू सोनवणे (रा. दहिवाळ, ता.मालेगाव) यांनी कापसाच्या ट्रकला गाडी आडवी लावून कापसाने भरलेला ट्रक चोरून नेला. तो चिंचगव्हाण येथील पप्पू उर्फ प्रशांत दशपुते यांच्या गोदामात नेऊन कापूस खाली केला. परंतु सकाळी ग्रामस्थ जागे होण्याच्या भीतीने कपाशी खाली न करता काही कपाशी ट्रक मध्येच ठेवून आर्वी येथे घाटात ट्रक सोडून दिला व त्यानंतर चोरलेला कापूस गुजरात येथे विक्री करुन पैशाची वाटणी आपसात करुन घेतली, अशी कबुली पोलीसांकडे आरोपींनी दिली.