बोरद येथे आढळले चार बिबटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 12:09 PM2020-05-26T12:09:31+5:302020-05-26T13:39:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद गावापासून हाकेच्या अंतरावर मिलींद लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या शेतात एकाचवेळी चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद गावापासून हाकेच्या अंतरावर मिलींद लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या शेतात एकाचवेळी चार बिबटे दिसून आले आहेत़ सोमवारी सकाळी हा प्रकार समोर आला होता़ याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर पथकाने येथे भेट देत दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत़
सकाळी शेतकरी मिलींद पाटील यांच्यासह मजूर शेवगा आणि गिलक्यांची तोडणी करत असताना त्यांना एकापाठोपाठ चार बिबटे दिसून आल्याची माहिती आहे़ बोरद वनपरिमंडळ अधिकारी नंदू पाटील, वनरक्षक विरसिंग पावरा, तपासणी पथकाचे वनरक्षक अमित पाडवी, वन्यजीव संस्थेचे नंदुरबार येथील पदाधिकारी अविनाश पाटील आदी सायंकाळपर्यंत येथे तळ ठोकून होते़ मिलींद पाटील यांच्या शेतातील गिलक्यांच्या दाट वेलींमध्ये लपण्याची जागा असल्याने बिबट्यांचा तेथे संचार असावा असा अंदाज आहे़ एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने बिबटे दिसून आल्यानंतर मजूर घराकडे परतले होते़ याठिकाणी बिबट्यांच्या पायांचे ठसे आहे़ वेगवेगळ्या आकाराचे ठसे असल्याने ते चार असल्याच्या दाव्याला दुजोरा मिळाला आहे़ मोहिदे शिवारात गेल्या आठवड्यात हिंस्त्र अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता़ या घटनेनंतर सध्या तळोदा तालुक्यात दक्षता घेण्यात येत आहे़