मोबाइलवर रेकॉर्ड केले अन् अडकले ‘लाचलुचपत’चे चौघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 02:13 PM2019-04-14T14:13:01+5:302019-04-14T14:13:48+5:30

खंडपीठाच्या आदेशाने चाळीसगाव येथे गुन्हा दाखल

Four bits of 'Bachchanchpat' recorded and stuck on the mobile | मोबाइलवर रेकॉर्ड केले अन् अडकले ‘लाचलुचपत’चे चौघे

मोबाइलवर रेकॉर्ड केले अन् अडकले ‘लाचलुचपत’चे चौघे

Next


चाळीसगाव : पोलीस कोठडी मागू नये यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले अन् त्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जळगाव येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक भीमा संभाजीराव नरके यांच्यासह चौघे अडकले. याप्रकरणी या चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील तत्कालीन मंंडळ अधिकारी सोमा भिला बोरसे यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ मे २०१७ रोजी लाचेच्या सापळ्यात पकडून अटक केली होती. यानंतर पोलीस कोठडी मागणार नाहीत, म्हणून या पथकातील पोलीस नाईक विजय उर्फ बाळासाहेब जाधव, पोलीस नाईक श्यामकांत पाटील, पो.कॉ.अरुण पाटील यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. ही मागणी बोरसे यांनी अमान्य केल्यामुळे न्यायालयात पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.
पैशांसाठी लावला तगादा
जामीन मिळाल्यानंतर ही पैशांसाठी त्यांचा तगादा सुरुच होता. यानंतर तुम्ही मोठी प्रॉपर्टी जमवली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे त्यांनी धमकावले होते. या विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भीमा संभाजीराव नरके व पथकातील संबंधित पोलिसांंनी बोरसे यांच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली असता ती त्यांनी मोबाइलवर रेकॉर्ड करुन घेतली. यानंतर पोलीस नाईक विजय जाधव यांनी चाळीसगाव येथे येवून त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. परंतु साहेबांना तीन लाख रुपये द्यावे लागतील व ही रक्कम चाळीसगाव येथील एका मित्राकडे द्या, असा साहेबांचा निरोप आहे. तुम्हाला तुमच्या संपत्तीच्या तपासातून निर्दोष बाहेर काढू, असे आश्वासन दिले होते. त्यांचे मोबाइलवरील व प्रत्यक्ष झालेले संभाषण बोरसे यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून संग्रहीत केले होते.
तत्काळ बदल्या करुन विभागीय चौकशी
हा घडलेला सर्व प्रकार त्यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे १२ जून २०१७ रोजी प्रत्यक्ष भेट देवून सांगितला होता. तसेच संभाषणाच्या रेकॉर्डींगच्या सी.डी.सोबत तक्रार अर्जही दिला होता. या तक्रार अर्जावरुन त्यांनी हा तपास पोलीस आयुक्त ठोंबरे (मुंबई) यांच्याकडे दिला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक भीमा नरके व संबंधित कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करुन विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले होते.
वरिष्ठांकडून दखल नाही...
वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून बदल्यांशिवाय कुठलीही कारवाई केली नाही म्हणून सोमा बोरसे यांनी जळगाव न्यायालयात संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी दाद मागितली होती. या न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. या खंडपीठाने ९ रोजी संबंधित चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १३ रोजी रात्री चाळीसगाव पोलिसांनी दखल घेतली.

Web Title: Four bits of 'Bachchanchpat' recorded and stuck on the mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.