भाजपातील चार नेत्यांची चार संपर्क कार्यालये
By Admin | Published: March 17, 2017 12:37 AM2017-03-17T00:37:17+5:302017-03-17T00:37:17+5:30
पक्ष कार्यालय कशासाठी? : चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुरेश भोळे व ए.टी. पाटील यांचे कार्यालय
जळगाव : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाच्या चार नेत्यांनी जळगावात चार ठिकाणी संपर्क कार्यालय थाटले आहेत. पक्ष कार्यालय असतानाही जनसंपर्कासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश भोळे व खासदार ए.टी. पाटील यांचा समावेश आहे. या चारही नेत्यांची जळगावात संपर्क कार्यालये आहेत.
जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. पालकमंत्री व आमदार सुरेश भोळे यांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या कॉम्पलेक्समध्ये संपर्क कार्यालय सुरु केले आहे. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जीएम फाउंडेशनच्या माध्यमातून संपर्क कार्यालय थाटले आहे. खासदार ए.टी.पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयासमोर संपर्क कार्यालय सुरु केले आहे.
पालकमंत्र्यांचे कोल्हापूरच्या धर्तीवर जळगावात संपर्क कार्यालय
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व सांगलीच्या धर्तीवर जळगावात संपर्क कार्यालय सुरु केले आहे. जळगावात त्यांचे स्वीय सहाय्यक दीपक परदेशी यांच्यासह चार जण नियुक्त केले आहे. आतार्पयत शिफारस पत्रांसाठी अर्ज व तक्रारींची 80 पेक्षा जास्त निवेदने प्राप्त झाली आहेत.
नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
मतदारांच्या भेटीसाठी आमदारांचे संपर्क कार्यालय
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी मतदारांच्या अडचणी, त्यांना येणा:या समस्यांचे निवारण करण्यासाठी संपर्क कार्यालय सुरु केले आहे.
त्यांच्या कार्यालयात सात ते आठ जणांची नियुक्ती आहे. त्यात शिफारस पत्र देणे, रेशनकार्ड, वृद्धांचे पगार सुरु करणे, धान्याच्या समस्या, गटारी व पाण्याच्या समस्या संदर्भात भेटण्यासाठी नागरिक येत असतात.
जलसंपदा मंत्र्यांचे आरोग्य सेवेसाठी संपर्क कार्यालय
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्य क्षेत्रातील काम मोठे आहे. मतदारांच्या संपर्कापेक्षा व्याधीग्रस्त नागरिकांना तत्काळ आरोग्य सुविधा मिळण्यासाठी संपर्क व्हावा या उद्देशाने महाजन यांनी शिवतीर्थ मैदानासामोर कार्यालय सुरु केले आहे. या ठिकाणी आरोग्य दूत यांच्यासोबत तक्रारी किंवा निवेदनाचा निपटारा करण्यासाठी कर्मचा:यांची नियुक्ती केली आहे.
माजी मंत्र्यांचे पक्ष कार्यालयातून कामकाज
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पालकमंत्री असताना स्वतंत्र संपर्क कार्यालय केले नव्हते. ते नागरिकांच्या भेटी तसेच तक्रारी व निवेदने भाजपाच्या जिल्हा कार्यालय तसेच त्यांच्या निवासस्थानी स्वीकारत होते. पक्ष कार्यालय किंवा निवासस्थानी भेट न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शासकीय विश्रामगृहावर एकनाथराव खडसे हे कार्यकत्र्याची व नागरिकांची भेट घेत होते.
आमदारांची नियमित तर मंत्री व खासदार वेळेनुसार उपलब्ध
आमदार सुरेश भोळे हे संपर्क कार्यालयात रोज भेट देत असतात. एखाद्या कार्यक्रमात व्यस्त असल्यास तक्रारदाराला ते कार्यक्रमस्थळी बोलवून घेतात. त्यांच्या कार्यालयात येणा:या प्रत्येक नागरिकाची रजिष्टरमध्ये नोंद करीत मोबाईल नंबर घेतला जातो. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा तीन वेळा दौरा झाला आहे. सध्या अधिवेशन सुरु असल्याने ते महिनाभरानंतर येण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री हे शनिवारी किंवा रविवारी तर खासदार ए.टी.पाटील हे त्यांच्या वेळेनुसार उपलब्ध होत असतात.