दोन लाखांच्या चोरीप्रकरणी बोदवडचे चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 07:29 PM2019-08-02T19:29:48+5:302019-08-02T19:38:53+5:30
नागपूरला चोरी : हजयात्रेकरुला दाखवला ‘हात’
बोदवड : अकोला येथील रहिवासी नईम काजी यांचे १ लाख ८० हजाराचे पाकीट नागरपूर येथे मारल्या प्रकरणी नागपूर रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी बोदवड येथे चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, अकोला येथील नईम काजी हे हज यात्रेला जाण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नागपूर येथे आले होते. तपासणी करून घराकडे परतत असताना मोमीनपूरा येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केले. जेवण करत असताना बाजूच्या बाकावर बसलेल्या आरोपीनींनी त्यांच्यावर पाळत ठेवत त्यांचा स्टेशन पर्यंत पाठलाग केला.
नईम काजी हे रेल्वे स्टेशनवर आले असता चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १ लाख ८० हजाराची रोकड लांबविली.
पोलीस आले बोदवडला
याप्रकरणी नागपूर रेल्वे पोलिसात कलम ३७९,३४, ४११, प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी नागपूर पोलिसांचे, पथक शुक्रवारी २ रोजी बोदवड शहरात आले होते. त्यांनी बोदवड पोलिसांची मदत घेऊन पहाटे सहा वाजता शहरातील सतरंजी मोहोल्ला भागात धाड टाकली व भागातील चार संशयित तरुणांना चौकशी साठी ताब्यात घेतले. त्यातील एक संशयित आरोपी आदिलशहा हा मेंढी बाबा यांचा मुलगा असून मुख्य आरोपी आहे, जाबिर, शब्बीर, सद्दाम अशी इतर आरोपींची नावे असून त्यांना संशयावरून ताब्यात घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी संशयित असल्याने त्यांची पूर्ण नावे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. यानंतर आरोपींना भुसावळ येथे अधिक चौकशीसाठी नेण्यात आले व तेथून सायंकाळी हे पथक नागपूरकडे रवाना झाले. सदर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नागपूर रेल्वे पोलीस पथकात एम.शेख, थॉमस, शेळके आदींचा समावेश होता. त्यांना बोदवड पोलिसांनी तपासासाठी मदत केली.