पहूर येथे एकाच रात्री झाल्या चार घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 09:55 PM2019-11-04T21:55:38+5:302019-11-04T21:55:44+5:30
पंचवीस हजारासह लाखाचा ऐवज लंपास : पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून परतावे लागले रिकाम्या हाती
पहूर, ता. जामनेर: संतोषीमाता नगरातील तीन घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण पंचवीस हजार रुपये रोख व लाखांचा ऐवज लंपास केला आहे. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी पोलीस अधिकाºयाचे बंद घर फोडले आहे. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. त्यामुळे चोरट्यांच्या रडारवर पोलीसही असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार शरद गंगाधर बेलपत्रे हे बाहेर गावी गेल्याचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. घरातील लोखंडी कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोकड लांबविली आहे. चोरटे याठिकाणी समोरील दरवाजा फोडून चोरी केल्यानंतर मागील दरवाजाने पसार झाले आहे. विशेष म्हणजे घराचे कुलूप घेऊन गेले आहे. बेलपत्रे बाहेर गावी गेले होते. शेजारच्यांमुळे प्रकार उघडकीस आला आहे.याठिकाणी दीड तोळे सोने व १५ हजार रोख असा ऐवज चोरीला गेल्याचे शरद बेलपत्रे यांनी सांगितले आहे. त्यांच्या बाजूचे रहिवासी बांधकाम व्यावसायिक सुनील कुमावत यांचे घर फोडले पण येथे काही मिळून आले नाही. याच भागातील शिक्षक विकास सुभाष पाटील यांचे बंद घर फोडले आहे. याठिकाणी दहा हजार रोख व एक तोळे सोने चोरट्यांना मिळाले. याच गल्लीतील रहिवासी व पोलीसउपनिरीक्षक किरण बर्गे हे बाहेर गावी गेले असल्याने त्यांचे बंद घर फोडले असून घरातील सर्व लाईट काढून एका ठिकाणी ठेवल्याचे आढळले आहे. मात्र चोरट्यांना येथे काही मिळून आले नाही.एकंदरीत घरफोड्या झालेली घरे ही बंद अवस्थेत असल्याची खात्री झाल्यावर पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनिरीक्षक अमोघ देवडे करीत आहे.
पोलीस टार्गेट
मागील घडलेल्या घरफोड्यांचा तपास आद्यपही लागला नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. आतातर पोलिस अधिकाºयाचे घर चोरट्यांनी टार्गेट केले आहे. त्यामुळे एक प्रकारे चोरट्यांचे थेट पोलिसांना आव्हान आहे. तर दुसरीकडे पहूर हे गाव जळगाव जिल्ह्यात अतिसंवेदनशील असून सुद्धा येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपुºया मणुष्यबळाचा फटका तपासाला बसत आहे. तरीही सपोनि राकेशसिंह परदेशी यांनी बिघडलेली कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न अल्पकाळात केल्याचे दिसून येत आहे.