एका पदासाठी होणार चार उमेदवारांची मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:20+5:302021-08-29T04:18:20+5:30
जळगाव : जिल्हा दूध संघातील भरती प्रक्रियेदरम्यान आरक्षित जागा वगळता इतर जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याने यासाठी घेण्यात आलेल्या ...
जळगाव : जिल्हा दूध संघातील भरती प्रक्रियेदरम्यान आरक्षित जागा वगळता इतर जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याने यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर मुलाखती घेण्यात येणार आहेत. एकूण १०४ जागांसाठी या मुलाखती होणार असून, एका जागेसाठी मेरिटनुसार चार उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. दरम्यान, आरक्षित जागेसंदर्भात ११ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिली.
जिल्हा दूध संघात अधिकारी वर्गासाठीच्या ३२, तर सहायक लिपिक वर्गाच्या १३२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केले व त्यानंतर परीक्षा झाली; मात्र या भरती प्रक्रियेवर दूध संघाच्या माजी कर्मचाऱ्यांनीच हरकत घेतली. दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून, ते भरती करू शकत नाहीत, तसेच आरक्षण लागू असताना विना आरक्षण भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लागू शकला नव्हता. २० ऑगस्ट रोजी याचिकेवर सुनावणी झाली. यामध्ये खुल्या जागांवरील भरती करण्याची परवानगी देण्यात आली असून, आरक्षित जागा न भरण्याचे आदेश दिले आहेत. १०४ जागांवर भरती होणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. अधिकारी वर्गासाठी ४००, तर सहायक लिपिकसाठी तब्बल दोन हजार ५०० अर्ज आले होते. खुल्या जागेवरील भरतीस परवानगी मिळाल्याने आता लवकरच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. आठ ते १० दिवसात मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुलाखतीसाठी गुणांनुसार एका पदासाठी चार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. ३० गुणांसाठी या मुलाखती होणार आहेत.