चार दशकांची योगसाधना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 02:32 PM2019-06-21T14:32:31+5:302019-06-21T14:32:36+5:30

चाळीसगावचे योगगुरू: कणकसिंग राजपूत यांची योग समर्पित जीवनसफर

Four decades of Yoga! | चार दशकांची योगसाधना !

चार दशकांची योगसाधना !

Next


चाळीसगाव : गेली चार दशकं कणकसिंग मानसिंग राजपूत हे चाळीसगावच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात योग प्रसारासाठी पायपीट करताहेत. कोणताही मोबदला न घेता विनामूल्य त्यांचे हे 'योग विद्यादान' सुरू असून शेवटच्या श्वासापर्यंत योगसेवा करीत राहू, असे ते आत्मविश्वासाने सांगतात. आजही ७९ वर्षीय कणकसिंग राजपूत दरदिवशी एक तास योग मार्गदर्शन करतात.
चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या आ.बं.विद्यालयात कणकसिंग राजपूत यांनी ३६ वर्षे सेवा केली. निवृत्तीनंतरची २१ व त्याधीची १९ अशी ४० वर्ष ते अखंड योगसाधना करीत आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील शाळांसह संस्था व मंडळांमधील विद्यार्थी व व्यक्तींना त्यांनी योग धडे दिले. सद्य:स्थितीतही योग मार्गदर्शनासाठी कुणीही बोलावले तर त्यांची ना नसते. शालेय सेवेतही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासापाठोपाठ योगाचेही ज्ञानार्जन केले आहे.
आणीबाणीमुळे भेटला योग
१९७५ मध्ये आणीबाणीत येथील योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांना मिसाबंदी कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात काही योगशिक्षकही अटकेत होते. वसंतराव चंद्रात्रे त्यांच्याकडून ते योग शिकले. पुढे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंद्रात्रे यांनी ना.बं.वाचनालयात योगाचे विनामूल्य क्लास सुरू केले. कणकसिंग राजपूत हे याचं क्लासचे पहिले विद्यार्थी. योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे हे त्यांचे योगगुरू. चंद्रात्रे आणि राजपूत या जोडगोळीने चाळीसगावकरांना योगाचीही गोडी लावली. गेल्या ४५ वर्षापासून वसंतराव व त्यांच्या पत्नी मीनाक्षी चंद्रात्रे योगाचे वर्ग घेत आहे. कणकसिंग राजपूत यांनीही याच वाटेवर आपली जीवन सफर सुरू ठेवली आहे. अनेकांच्या मनात आणीबाणीच्या कटू आठवणींचे व्रण आजही आहेत. मात्र आणीबाणीमुळे आम्हाला योग भेटला. असे मिश्किलपणे कणकसिंग राजपूत सांगतात.
१५ हजार नागरिकांना योगाची दीक्षा
राजपूत यांनी गेल्या ४० वर्षात १५ हजारांहून नागरिकांना योगजीवन दिले आहे. बालशिबिरांमध्येही ते विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योगाची अष्टांग करून दाखवितात. डॉक्टर्स, पोलीस, संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक व प्राध्यापक, शासकीय कर्मचाऱ्यांना राजपूत यांनी योग शिकवला आहे.
योगामुळे शरीर सुदृढ राहते. आयुष्यात दुसऱ्यांदा भरपूर गोष्टी मिळतात. मात्र शरीर पुन्हा मिळत नाही. त्यामुळे मिळालेल्या शरीराला योगाचा 'च्यवनप्राश' रोज दिला पाहिजे, असे मार्गदर्शन कणकसिंग राजपूत करतात.

Web Title: Four decades of Yoga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.