उत्राण येथे एकाच कुटुंबातील चौघांवर कु-हाडीने वार; पतीचा मृत्यू, पत्नी, मुलगा, मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:22 PM2018-07-05T13:22:45+5:302018-07-05T13:25:10+5:30
एरंडोल तालुक्यातील थरारक घटना
उत्राण, जि. जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे शेतात राहणाऱ्या पावरा समाजाच्या कुटुंबावर कुºहाडीने वार करण्यात आल्याची थरारक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये सुकलाल रिचा भिलाल यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी पारो भिलाल (३६), मुलगी सीमा भिलाल (१२), मुलगा गोविंद भिलाल (९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील संशयीत ज्ञानसिंग पालसिंग पावरा याने रेल्वेखाली आत्महत्या केली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुकलाल भिलाल हे पत्नी, पाच मुले, एक मुलगी यांच्यासह उत्राण शिवारातील राजू पाटील यांच्या मालकिच्या शेतात काम करतात. त्यासाठी ते शेतातच झोपडीमध्ये राहत होते. बुधवारी मोठा मुलगा रतन भिलाल हा कामावर गेलेला होता व इतर भावंडेही बाहेर गावी होती. घरात वरील चौघे जण झोपलेले असताना गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चौघांवर कुºहाडीने वार करण्यात आले.
सकाळी रतन भिलाल हा घरी आल्यानंतर ही घटना समजली. त्या वेळी त्याने उत्राण गावातच राहत असलेल्या त्याच्या काका व इतरांना या बाबत कळविले. नातेवाईकांनी तेथे धाव घेतली असता सुकलाल भिलाल यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यातील गोविंदची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्ला करणारा संशयीत ज्ञानसिंग पावरा याने रेल्वेखाली आत्महत्या केली.